राहाता: साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला साईभक्तांच्या धूमस्टाईल पद्धतीने सोन्याचे दागिने ओरबाडणाऱ्या टोळीने गेल्या ४१ महिन्यांत, या पद्धतीने ५१ गुन्ह्यांची शिर्डी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या टोळीने २ किलो ४२० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या सोन्याची अंदाजे किंमत सुमारे २ कोटी रुपये इतकी आहे.
शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कोते यांनी, पोलिसांकडून माहितीच्या अधिकारात ही धक्कादायक माहिती मिळवली आहे. देशभरातील महिला साईभक्तांबरोबरच स्थानिक महिलांनाही या टोळीचा झटका बसल्याचे समोर आले आहे. धूमस्टाईल दागिने ओरबाडणाऱ्या टोळीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुखांनी कठोर भूमिका घेण्याची मागणी कोते यांनी केली आहे.
दिगंबर कोते यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळोवेळी पोलीस कारवाईत ३५ लाख ६० हजार ५०० रुपयांचे ४२८ ग्रॅम ६१० मिग्रॅ सोने आरोपींकडून जप्त करण्यात आले. यामधून २३ मूळ मालकांना ५२६ ग्रॅम सोन्याचे दागिने न्यायालयाच्या परवानगीने परत देण्यात आले आहेत. आजच्या भावाप्रमाणे त्याची किंमत अंदाजे ४५ लाख रुपये इतकी आहे. त्याचबरोबर काही साईभक्त सोने चोरीला गेल्यानंतर परत मिळण्यासाठी पाठपुरावा करत नसल्याने व चौकशीसाठी येत नसल्याने विविध गुन्ह्यांत जप्त केलेले ६१९ ग्रॅम ९४० मिग्रॅ.चे अंदाजे ४७ लाख २३ हजार ८६६ रुपयांचे जप्त केलेले सोन्याचे दागिने पडून आहेत.
शिर्डी पोलिसांनी शहरात विविध भाषांत चोरांपासून सावध रहा, असे फलक लावलेले आहेत. मात्र, परराज्यांतील साईभक्तांना सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणावर घालण्याचा छंद असतो. सायंकाळी किंवा पहाटे साईदर्शनासाठी व आरतीसाठी जाताना वा परतताना रस्त्याने बेसावध पायी चालताना धूमस्टाईल चोरांनी महिलांना फटका दिलेला आहे.
यात नशिबाला दोष देत गुन्हा दाखल न करणाऱ्या भाविकांची नोंद नसल्याने साईनगरीत धूमस्टाईल चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. धूमस्टाईलने दागिने ओरबाडणारी टोळी सोन्याचे दागिने कुठे व कोणाला विकते याचाही शोध पोलिसांनी घेण्याची आवश्यकता आहे. अशा घटना रोखण्यासाठी साईबाबा संस्थान, शिर्डी पोलीस व शिर्डी नगर परिषदेने संयुक्तपणे कारवाई व प्रबोधन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.
चिंता वाढवणारी आकडेवारी
१) ४१ महिन्यांत दाखल गुन्हे – ५१
२) धूमस्टाईलने चोरी गेलेले सोने – दोन किलो ४२० ग्रॅम
३) कारवाईत जप्त सोने – ४२८ ग्रॅम ६१० मिग्रॅ.
४) फिर्यादीस परत दिलेले सोने – ५२६ ग्रॅम
५) एकूण सोन्याची अंदाजे किंमत – २ कोटींहून अधिक