राहाता : राजस्थानमधील साईभक्ताला आईच्या अंत्यसंस्कारासाठी गावी पोहोचवण्याची जबाबदारी शिर्डीतील तरुण वाहनचालकाने कोणताही मोबदला न घेता माणुसकीच्या भावनेतून पार पाडली. शाहरुख पठाण असे या वाहनचालकाचे नाव असून, त्याने सलग ९ तास ५५० किमी मोटार चालवत साईभक्ताला आईच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचवले. शिर्डीत या वाहनचालकाचे अनेकांकडून कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे आशिष जैन त्यांच्या आईच्याच इच्छेनुसार शिर्डीमध्ये आले होते. दर्शनानंतर लगेचच त्यांना आईच्या निधनाचे वृत्त समजले. अंत्यसंस्कारासाठी त्यांना वेळेत राजस्थानला पोहोचणे आवश्यक होते. खासगी मोटारीसाठी प्रचंड भाडे आकारले जात असताना जैन यांना त्यांच्या दुःखद प्रसंगात शिर्डीतील शाहरुख पठाण यांनी मदतीचा हात पुढे केला.
आशिष जैन १५ वर्षांपासून दर पौर्णिमेला साईबाबा समाधी दर्शनासाठी येतात. शिर्डीतील हैदर पठाण यांच्या लॉजवर ते मुक्काम करतात. यंदाच्या साईदर्शनात तीन महिन्यांचा खंड पडला. त्यामुळे आईनेच त्यांना शिर्डीला जाण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार ते गेल्या शुक्रवारी मित्रासमवेत शिर्डीत दाखल झाले आणि पठाण यांच्या लॉजवर थांबले.
दर्शनाला जाण्यापूर्वी त्यांनी लॉजच्या खोलीत मोबाइल चार्जिंगसाठी ठेवला होता. साई दर्शन घेऊन ते लॉजवर आले असता, तब्बल २० कॉल येऊन गेले होते. त्यांनी घरी फोन केला असता, आईचे निधन झाल्याचे वृत्त समजले. अंत्यसंस्कारासाठी तातडीने राजस्थानला जाण्याची सुविधा नव्हती. बस रात्री उपलब्ध होती, तर खासगी मोटारीचे भाडे परवडणारे नव्हते. अशा परिस्थितीत जैन यांना हैदर पठाण यांनी माणुसकीचा हात देत धीर दिला आणि मुलगा शाहरुख याला स्वतःच्या मोटारीने अंत्यविधीसाठी वेळेत पोहोचवण्यास सांगितले. काही मिनिटांतच जैन यांना घेऊन शाहरुख राजस्थानकडे, रतलाम या गावी रवाना झाले.
कर्तव्य पार पाडले
जैन यांच्या गावापर्यंत एका बाजूचे अंतर ५५० किमी आहे. जेवण वा नाश्त्यासाठीही न थांबता सलग नऊ तास वाहन चालवत जैन यांना वेळेत आईच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचवून मी माझे कर्तव्य पार पाडले. खासगी वाहनाचे किमान २० हजार रुपयांहून अधिक भाडे झाले असते. परंतु माणुसकीच्या भावनेने मी कोणतेही पैसे आकारले नाहीत. भाविकांची सेवा व वेळेवर मदत करणे हाच प्रामाणिक हेतू होता असे शिर्डीतील हा वाहनचालक शाहरुख पठाण याने सांगितले.