राहाता: शिर्डी परिसरातून ३५० कोटींची गुंतवणूक ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीसाठी केली जाते, ही माझ्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे. झटपट मार्गाने पैसे कमावण्याच्या अनेक योजनेमुळे नागरिकांचे पैसे बुडीत गेल्याच्या घटना निदर्शनात येऊनदेखील नागरिक अशा योजनांमध्ये आपले पैसे गुंतवतात ही दुर्दैवी बाब असल्याची प्रतिक्रिया डॉ. सुजय विखे यांनी शिर्डीत बोलताना दिली.
शिर्डीतील ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून शिर्डी परिसरातील अनेकांची पैसे दुप्पट मिळण्याच्या आमिषाने फसवणूक झाली. याबाबत शिर्डी व राहाता पोलीस ठाण्यात या कंपनीच्या संचालकांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना विखे म्हणाले की, या कंपनीत जवळपास ७० टक्के साईबाबा संस्थानमधील कर्मचारी आहेत.
त्यापैकी ४ कायमस्वरूपी सेवेत असलेल्या संस्थांनच्या कर्मचाऱ्यांनी या कंपनीत पैशाची गुंतवणूक करण्यासाठी एजंटगिरी केल्याचे समजते. ज्या कोणी या प्रकरणात एजंटगिरी तसेच या पैशाच्या माध्यमातून सावकारकी केली अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या जातील.
गरिबांची पैसे मिळाले पाहिजे, ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भूमिका आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. परंतु, हे पैसे मिळणे अत्यंत कठीण असून, यासाठी खूप काळ जाईल. यात सुदैवाने राजकीय व्यक्ती म्हणून आमचा काही सहभाग नाही. नागरिकांनी त्यांचे पैसे परस्पर गुंतवले, त्यांना कोणी बळजबरी केली नव्हती. ही योजना अशीच आहे की सुरुवातीला ही एवढी भावते की अधीक पैसे गुंतवायला लागतो आणि नंतर त्यात अडकले जातो.
आमच्या संवेदना सर्व गुंतवणूकदारांबरोबर आहेत. जेवढे प्रशासकीय बळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून लावता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. या पैशातून ज्यांनी सावकारकी केली त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे. दहा दिवसांत त्यांच्यावर कारवाई होताना दिसेल. हे रॅकेट खूप मोठे असल्याचे डॉ. विखे यांनी सांगितले.