राहाता : शिर्डी येथील साईबाबा संस्थानने बुंदी लाडू प्रसादाचा भाव ५० टक्क्यांनी वाढविला आहे. पूर्वी वीस रुपयांना मिळणारी दोन लाडूची पाकिटे आता तीस रुपयांना मिळणार आहेत. लाडू प्रसाद पाकिटाचे भाव का वाढविले याबाबत भाविकांसह स्थानिक नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना आता साईप्रसाद म्हणून मिळणाऱ्या लाडूसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. साईसंस्थानने लाडूच्या पाकिटाची किंमत १० रुपयांनी वाढवली आहे. ५० ग्रॅम वजनाचे दोन लाडू असलेले पाकीट आता २० ऐवजी ३० रुपयांना मिळणार आहे. दोन लाडूंच्या पाकिटावर १० रुपयांची दरवाढ करण्याऐवजी ३० रुपयांमध्ये तीन लाडू द्यावे, अशी मागणी आता भाविकांकडून केली जात आहे.

साईभक्तांना मोफत वाटल्या जाणाऱ्या बुंदी प्रसादातील तोटा भरून काढण्याच्या हेतूने ही दरवाढ केली असल्याचे समर्थन संस्थान प्रशासनाकडून केले जात आहे. गोरगरिबांना परवडणारे दहा रुपयांचे एक लाडूचे पाकीट (ज्याची वार्षिक विक्री दीड कोटींच्या घरात होती) आणि मध्यमवर्गीयांना सोयीचे पंचवीस रुपयांचे तीन लाडूचे पाकीट बंद करून संस्थानने केवळ हा एकच पर्याय ठेवला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख गाडीलकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

अत्यंत चुकीच्या पद्धतीने साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा चुकीचा निर्णय घेतला आहे. बुंदी प्रसाद हा मोफतच देत आहोत व द्यायचा असतो. लाडू व नाश्ता पाकीट याची किंमत नाममात्र ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे याला विरोध होणे अपेक्षित आहे. लाडू विकून बुंदी प्रसादाची रक्कम वसूल करणे व व्यवसाय पाहणे अत्यंत चुकीचे आहे. एकीकडे अन्नदान फंडात शेकडो कोटी शिल्लक असताना हा अट्टाहास संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोणाचे ऐकून करत आहेत. – प्रमोद गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते, शिर्डी.