राहाता : महत्त्वाच्या आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या (व्हिआयपी) दर्शनासाठी ठरावीक वेळेतच दर्शन व्यवस्था काल, रविवार दुपारपासून साईबाबा संस्थानने सुरू केली. साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दर्शन रांगेतील व्यत्यय टळणार असून, सामान्य भक्तांची दर्शनप्रक्रिया अधिक सुलभ होईल, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. गेल्या काही वर्षांपासून महत्त्वाच्या व्यक्तींच्या दर्शनासाठी दिवसभरात केव्हाही दर्शन रांग थांबवावी लागत होती. यामुळे सामान्य दर्शनरांगेतील भक्तांना त्रास सहन करावा लागत होता आणि त्यामुळे दर्शनाला वेळ लागत होता. याशिवाय, सुरक्षा आणि इतर प्रशासकीय यंत्रणांवरही अतिरिक्त ताण येत होता.

अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि मोठ्या देणगीदारांना वेळेचे बंधन नसेल, त्यांची दर्शनाची व्यवस्था पूर्वीप्रमाणेच आहे. राजकीय आणि न्यायिक पदाधिकारी, भारताचे आजी-माजी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, सर्व राज्यांचे राज्यपाल, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, केंद्रीय मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्री, विधानसभा, विधान परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष, आमदार, खासदार आणि विविध उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश व इतर न्यायाधीश, प्रसिद्ध उद्योगपती, आंतरराष्ट्रीय खेळाडू, सिनेअभिनेते, शास्त्रज्ञ आणि संस्थानच्या व्यवस्थापन, तदर्थ समितीचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणारे साईभक्त यांना या ठरावीक दर्शनातून सवलत देण्यात आली आहे.

नवी व्यवस्था

नव्या नियमांनुसार, शिफारस घेऊन येणाऱ्या मान्यवरांना आता केवळ निश्चित वेळेतच साईदर्शन घेता येणार आहे. यासाठी दिवसातून तीन वेळा निश्चित करण्यात आली आहे. सकाळी ९ ते १० (एक तास), दुपारी २:३० ते ३:३० (एक तास), रात्री ८:०० ते ८:३० (अर्धा तास) या वेळेत समाधी मंदिरातील एका बाजूने या ठरावीक वेळेच्या म्हणजेच ‘ब्रेक दर्शनाची’ सोय केली जाईल. जेणेकरून सामान्य भक्तांची दर्शनरांग अव्याहतपणे सुरू राहण्यास मदत होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी खासदार विखे यांचा फॉर्म्युला मान्य

माजी खासदार सुजय विखे यांनी साई संस्थानला तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर सुचवलेल्या पहाटेच्या व्हीआयपी दर्शनचा फॉर्म्युला अखेर सत्यात उतरला आहे. शिर्डीच्या प्रसादालयातील फुकट जेवणाचा मुद्दा डॉ. विखे यांनी उपस्थित केल्यानंतर कार्यकारी अधिकारी गाडीलकर यांनी त्यावर अंमलबजावणी करत फुकट जेवण बंद केले. आता त्यांची व्हीआयपी दर्शनाची दुसरी मागणी मान्य झाली आहे.