राहाता : शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागाचे कर्मचारी साहेबराव झिंजुर्डे यांनी साईभक्ताच्या विसरलेल्या बॅगमधील ४ लाखांचा सोन्याचा ऐवज परत करून प्रामाणिकपणाचा संदेश दिला. या कर्मचाऱ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. १५ महिन्यांत सुमारे १५० ते १६० साईभक्तांना ४० ते ४५ लाख रुपये किमतीचा ऐवज परत करण्यात आला आहे.
साई आश्रम भक्त निवास क्रमांक १ येथे नियुक्त कंत्राटी सुरक्षारक्षक साहेबराव झिंजुर्डे यांना एक बॅग सापडली. त्यांनी सुरक्षा अधिकारी बाळासाहेब पगारे व पर्यवेक्षक नानासाहेब गाडेकर यांना दिली. बॅगेत सोन्याचे दागिने होते. बॅगचे मालक साईभक्त गजानन निवृत्ती मिरकडे, (रा. नवी मुंबई) हे दर्शनानंतर मुंबईकडे निघाले होते. बॅग विसरल्याचे लक्षात येताच त्यांनी साईआश्रम येथे काही वेळानंतर फोन करून माहिती दिली.
सुरक्षा अधिकाऱ्यांनी, बॅग सापडली असून तुम्ही परत येऊन ती घेऊन जा असे त्यांना सांगितले. गजानन मिरकिडे ५० किमी दूर गेले होते. ते परत आले व सांगितले, की बॅगेत जवळपास ४ तोळे सोन्याचे दागिने आहेत. आम्हाला बॅग परत मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. मात्र, साईबाबा संस्थानमधील प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी ऐवज परत केला. ही गोष्ट फक्त साईबाबांच्या भूमीतच घडू शकते. आम्ही संस्थानच्या कर्मचाऱ्यांचे ऋणी आहोत.
प्रामाणिक सुरक्षा कर्मचारी साहेबराव झिंजुर्डे यांचे संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी अभिनंदन केले. संरक्षण अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांनी झिंजुर्डे यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला.
प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे कौतुक
मी साईबाबा संस्थानच्या संरक्षण अधिकारी पदावर १९ फेब्रुवारी २०२४ रोजी नेमणूक झाल्यापासून आतापर्यंत १५० ते १६० साईभक्तांचे गहाळ अथवा हरवलेल्या वस्तू, किमती ऐवज साईबाबा संस्थानच्या संरक्षण, तसेच विविध कर्मचाऱ्यांना सापडले होते. त्यांनी ते संरक्षण विभागाच्या कार्यालयात जमा केले. त्यानंतर ओळख पटवून संबंधित साईभक्तांना ऐवज परत केला आहे. त्याची एकूण रक्कम ४० ते ४५ लाखांच्या दरम्यान आहे. साईभक्तांना हरवलेल्या वस्तू परत मिळाल्याने त्यांनी प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. प्रामाणिक कर्मचाऱ्यांचे साईबाबा संस्थानाच्या वतीने भेटवस्तू देऊन सन्मान करण्याचा उपक्रम सुरू केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चांगली भावना निर्माण झाली असल्याचे शिर्डीतील साईबाबा संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांनी सांगितले.