मोहनीराज लहाडे, लोकसत्ता
नगर : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या उपस्थितीत नगरमध्ये शिवसंपर्क अभियान राबविण्यात आले. त्यांचा शहरातील दौरा शिवसेना पक्षांतर्गत उखाळय़ापाखाळय़ांनी आणि खपली धरलेल्या जुन्या जखमेला पुन्हा भळभळून टाकणारा ठरला. ज्यांच्याविरुद्ध तक्रारी आहेत असे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर अभियानात अनुपस्थित होते. हा दौरा महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचा कसा कोंडमारा होतो आहे, याला वाचा फोडणारा ठरला. जिल्ह्यात शिवसेनेची राष्ट्रवादीकडून अधिक कोंडी होत असल्याचेही, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून उघड झाले आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या अधिक, पालकमंत्रिपदही त्यांच्याकडेच असल्याने स्वाभाविकपणे जिल्ह्यावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात शिर्डी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. मात्र शिवसैनिकांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी ते उत्तरेतील राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा भाजपच्या प्रस्थापित नेतृत्वाशी पंगा घेण्यास तयार नाहीत. जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नाही. उपनेते, माजी राज्यमंत्री अनिल राठोड यांच्या निधनानंतर नगरमध्ये शिवसेनेला एकमुखी नेतृत्व राहिले नाही. अपक्ष शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्याकडे जलसंधारण मंत्रिपद आणि जिल्हा शिवसेनेचे नेतृत्व सोपवण्यात आले. गडाख यांच्या उपस्थितीत गेल्या वर्षी जुलै २०२१ मध्ये शिवसंपर्क अभियान-१ह्ण राबविण्यात आले. त्यासाठी गडाख जिल्हाभर फिरले. मात्र आघाडीमध्ये होणारम कोंडमारा, अवहेलनाविषयी गडाख यांच्याकडे शिवसैनिकांनी तक्रार केल्या नाहीत. वर्षांनंतर शिवसंपर्क अभियान-२ह्ण राबवण्यासाठी कट्टर नेते खासदार कीर्तिकर नगरमध्ये आले आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे, आघाडीमध्ये होणाऱ्या कुचंबणेबद्दल तक्रारी केल्या. राज्याच्या सत्तेतील अडीच वर्षांनंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सुरुवातीचे गोडीगुलाबीचे दिवस आता सरले आहेत, हेच यावरून उघड झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील माजी आमदार अरुण जगताप व त्यांचे पुत्र विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्यातील राजकीय वैमनस्य तीव्र आहे. शिवाय तोच दोन्ही पक्षांचा जनाधारही आहे. केडगाव उपनगरातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाने हे वैमनस्य धारदार बनवले आहे. त्याकडे दुर्लक्ष करत शिवसेनेने राष्ट्रवादीचा आधार घेत महापौरपद मिळवले. ही आघाडी शिवसेनेतील एका गटाला, राठोड समर्थकांना मान्य नाही. त्याचे पडसाद अधूनमधून उमटत असतात. महापालिकेत मिळालेल्या सत्तेमुळे शिवसेनेच्या या जखमेवर खपली धरण्यास सुरुवात झाली होती.
खासदार कीर्तिकर यांनी या जुन्या जखमेचा थेट उल्लेख करत, आमदार जगताप यांच्यावर असलेल्या गुन्ह्याकडे लक्ष वेधत, आपलेच शिवसेनेचे काही नगरसेवक राष्ट्रवादीच्या आमदारांना लपूनछपून सहकार्य करतात, त्यामुळेच राठोड यांचा पराभव झाला, शिवसेनेने घडवलेले कार्यकर्ते, पदाधिकारी इतर पक्षांकडून पळवले जातात, जिल्ह्यात प्रस्थापितांच्या संस्थेत नोकरी करून शिवसेनेच्या पक्ष संघटनेत पदे मिळवतात, अशा सर्वाना उघडे पाडा, असेही आवाहन किर्तिकर यांनी केले. राष्ट्रवादीचा आधार घेत महापालिकेच्या सत्तेत आलेल्या शिवसेनेची ही जखम भळभळण्याव्यतिरिक्त काय घडणार, अशी भावना शिवसैनिक बोलून दाखवत आहेत.
संपर्कप्रमुख शिवसेना पदाधिकाऱ्यांपेक्षा राष्ट्रवादी आमदारांच्या अधिक संपर्कात असतात, त्यांच्या सल्ल्याने नियुक्त्या करतात, नगरसेवक पदाधिकाऱ्यांना भेटतही नाहीत, त्यामुळे त्यांना हटवा. शिवसेनेचा महापौर असुनही त्यांच्याकडून पक्षाच्या नगरसेवकांना निधी वितरणात डावलले जाते. राष्ट्रवादीला प्राधान्य मिळते, अशाही तक्रारी करण्यात आल्या. या सर्वास पालकमंत्री शिवसेनेच्या कामांना निधी देत नसल्याचा अहवाल आपण पक्षप्रमुखांना सादर करू, असे कीर्तिकर यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.
कामासाठी निधीच्या मागणीसाठी कोणीही शिवसेना पदाधिकारी माझ्याकडे आला नाही. तीन पक्षांचे सरकार असल्याने ज्या पक्षाचे आमदार अधिक तेथे हा प्रश्न कमी-अधिक जाणवणार. मुंबई-ठाणेमध्ये शिवसेनेची ताकद आहे. तिथे अन्य दोन पक्षांवर असाच अन्याय होतो. मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाच्या आमदार, खासदारांची बैठक घेतात तशीच बैठक त्यांनी सर्व पक्षांच्या आमदार, खासदारांची घेतल्यास गैरसमज दूर होतील.
– हसन मुश्रीफ, पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री
नगरमध्ये शिवसेना मजबूत करून इतर राजकीय पक्षांना तडाखे देण्यासाठी सज्ज व्हा, निर्भय नगर-स्वबळ नगरची खूणगाठ बांधा, पालकमंत्री शिवसेनेच्या कामांना निधी देत नसतील, शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या समित्यांवर अद्याप नियुक्त्या केल्या नसतील तर लेखी अहवाल द्या, पक्षप्रमुखांपुढे मांडू. – गजानन कीर्तिकर, शिवसेना खासदार