पस्तीस वर्षांपूर्वी शिवसेनेची जिल्ह्णातील पहिला शाखा सुरू करणारा शाखाप्रमुख दत्तात्रय नारायण वऱ्हाडे. उतरत्या वयातील या साठ वर्षांच्या शिवसनिकाला चरितार्थासाठी चहाच्या टपरीचाच आधार आहे. सेनेत कोण आला, कोण सेना सोडून निघून गेला? यापासून कोसो मैल दूर असलेल्या वऱ्हाडे यांची धनुष्यबाण आणि बाळासाहेब हीच खरीखुरी दौलत. मात्र, या शाखाप्रमुखाला दररोज दोन लिटर रॉकेल आणि एक किलो साखरेचा मेळ घालण्यासाठी धडपड करावी लागते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उस्मानाबाद जिल्ह्णाात धनुष्यबाण १९८९च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा यशवंत पेठे यांच्या उमेदवारीने मतदारांसमोर आला. तोवर धनुष्यबाणाची ओळखसुद्धा नव्हती. त्यापूर्वी सात वष्रे अगोदर १९८२ साली काही तरुणांनी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी प्रभावित होऊन जिल्ह्णाात पहिली शाखा उस्मानाबाद शहरात सुरू केली. ना जिल्हाप्रमुख, ना तालुकाप्रमुख तरी देखील सेनेचा पहिला फलक विजय चौकात झळकला. दत्तात्रय नारायण वऱ्हाडे चहाची टपरी चालविणारा तरुण पहिला शाखाप्रमुख झाला. शहरप्रमुख पदाची धुरा प्रदीप साळुंके यांच्यावर देण्यात आली. शाखा सुरूकरण्यासाठी खिशातील २५ रुपये वऱ्हाडे आणि त्याचे सहकारी वल्लभ पवार, डी. एन. कोळी, विलास पाटील, संजय पाटील दुधगावकर, बाळासाहेब िशदे, बबन बागल यांनी त्या वेळी खर्च केले होते, तेही चक्क हॉटेल बंद ठेवून. त्यानंतर भारत इंगळे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली. ज्या शिवसनिकाच्या रिक्षातून प्रवास करून ग्रामीण भागात शाखा स्थापन करण्यात आल्या, ते विष्णू साळुंके आजही रिक्षा चालवितात. त्यात बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा आजही जशीच्या तशी आहे.

मागच्या ३५ वर्षांत जिल्ह्णााने शिवसेनेला काय दिले आणि सेनेने उस्मानाबादकरांना काय दिले? याचा आढावा घेतल्यास सेनाच फायद्यात राहिली. १९८९च्या निवडणुकीनंतर येथील सामान्य शिवसनिकांनी शिवाजी कांबळे, कल्पना नरहिरे, प्रा. रवींद्र गायकवाड हे तीन खासदार आणि रवींद्र गायकवाड, कल्पना नरहिरे, ज्ञानेश्वर पाटील, दयानंद गायकवाड, ज्ञानराज चौगुले आणि ओम राजेिनबाळकर हे सहा आमदार आजवर निवडून दिले आहेत.  विलास भानुशाली, रमाकांत मयेकर, छगन भुजबळ, दिवाकर रावते आणि स्वत: बाळासाहेब ठाकरे यांनी जिल्ह्णाात येऊन या तरुणांना बळ दिले आणि सेना रुजली.

जिल्ह्णाातील सेनेत सध्या अनेक आयाराम, गयाराम महत्त्वाच्या पदावर आहेत. मात्र, पहिली शाखा सुरूकरणारा निष्ठावान शिवसनिक चरितार्थासाठी चहाच्या टपरीवरच विसंबून आहे. सध्या पालिका निवडणुकीची सर्वत्र धामधूम सुरू आहे. मागील आठ दिवसांपासून स्वत:ची टपरी बंद ठेवून हा साठ वर्षांचा शाखाप्रमुख पायाला िभगरी लावून धनुष्यबाणाचा प्रचार करीत आहे. मंगळवापर्यंत हॉटेल बंद, सोमवारी गुलाल लावूनच बुधवारी टपरी सुरूकरणार असल्याचे वऱ्हाडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना उत्साहात सांगितले. दोन मुले, चार मुली, असा कुटुंबकबिला असलेल्या दत्तात्रय वऱ्हाडे यांनी कर्ज काढून तीन मुलींची लग्न केली. त्यांच्या मुलींच्या लग्नसोहळ्यात ना खासदार फिरकले, ना आमदार. तरी देखील त्यांच्या मनात ना राग ना द्वेष. प्रत्येक निवडणुकीत आजही मोठय़ा हिरीरीने प्रचाराची जबाबदारी ते पार पाडत आहेत.

‘बाळासाहेबांचे रेडिओवर भाषण ऐकून आपण शिवसनिक झालो. तेव्हा खिशातील पसे खर्च करून शिवसेनेचे रोपटे लावले. आता त्याला फळे आली आहेत. अशावेळी शिवसनिकांतच मतभेद पाहिल्यानंतर खेद वाटतो. सत्तेच्या फळाशी देणे-घेणे नाही. चहा विकून तेव्हा शाखा स्थापन केलेल्या शाखा आता जिवंत नसल्याचे पाहून दु:ख होते. सेनेत कोण आले, कोण गेले, याचा विचार करीत बसण्यापेक्षा आपण आयुष्यभर निष्ठावान शिवसनिक म्हणून काम करीत राहणार.’  – दत्तात्रय वऱ्हाडे

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena
First published on: 24-11-2016 at 00:58 IST