सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक टर्मिनस भूमिपूजन सोहळ्यात शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सर्वाचे लक्ष वेधणारी ठरली. सुमारे १८ वर्षांनंतर कोकण रेल्वेच्या राज्यातील शेवटच्या स्थानकाचा विकास होत असताना शिवसेना-भाजपतील घोषणाबाजी सवतासुभा दर्शविणारी ठरली. महाराष्ट्राचे शेवटचे रेल्वे स्थानक म्हणून सावंतवाडी रोड स्थानक ओळखले जाते. हे गोवा राज्याचे प्रवेशद्वारही आहे.  सावंतवाडी शहराला संस्थानचा ३५० वर्षांचा वारसा आहे. इतिहासकालीन वैभव लाभलेल्या या स्थानकाचा विकास रखडला होता. प्रा. मधू दंडवते या भागाचे खासदार होते. ते देशाचे अर्थमंत्री बनल्यानंतर अ. वा. वालावलकर व बॅ. नाथ पै यांचे रेल्वेचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी त्या वेळचे रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नाडिस व नियोजन आयोगाचे अध्यक्ष रामकृष्ण हेगडे यांच्या साथीने कोकण रेल्वे सत्यात उतरली. ती सावंतवाडीपर्यंत मर्यादित राहिली नाही, थेट केरळपर्यंत पोहोचली. सावंतवाडी टर्मिनससाठी माजी आमदार जयानंद मठकर व दीपक केसरकर यांच्या संघर्ष समितीने सातत्याने पाठपुरावा केला, तर मडुरा टर्मिनससाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आग्रह धरला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे सावंतवाडी टर्मिनसचे स्वप्न पूर्ण होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शिवसेना-भाजप युती आहे. या युतीच्याच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करावी हे अनेकांना रुचले नाही. उलट विरोधकांनी निदर्शने व घोषणाबाजी केली असती तर चालून गेले असते, पण शिवसेना-भाजपने श्रेयासाठी घोषणाबाजी केल्याचे बोलले जात आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना-भाजप युती आहे याची जाणीव करून दिल्यावर शिवसेना-भाजप युतीच्या एकत्रित घोषणा देण्यात आल्या. भाजपच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे स्वागत करून विकासाची निवेदनेही दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena bjp at sawantwadi
First published on: 28-06-2015 at 06:14 IST