​सावंतवाडी: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुती झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती करून लढण्याबाबत शिवसेना नेते आणि आमदार दीपक केसरकर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शिवसेना नेते उद्या (शनिवार )मुंबईत भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

​उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून, उद्या शनिवारी मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे आमदार केसरकर यांनी सांगितले. ते स्वतः, आमदार निलेश राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासह शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

​आमदार केसरकर म्हणाले, “महायुतीतून सर्व निवडणुका लढविण्याचा यापूर्वी निर्णय झाला होता. त्यामुळे आता उशीर झाला तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणं अवघड होईल, म्हणून चर्चा करणे गरजेचे आहे.”

​महायुतीचा निर्णय लवकर न झाल्यास शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांचे प्रवेश अडवून ठेवणे योग्य नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले. “महायुती होणार असल्याने प्रवेश थांबले आहेत. मात्र, महायुती झाली नाही तर ते प्रवेश अडवून ठेवणे योग्य नाही,” असे केसरकर म्हणाले.

 ‘स्वच्छता मॉनिटरप्रकरणी नाराजी

​मुंबईतील रोहित आर्या यांच्या ‘स्वच्छता मॉनिटर’ संकल्पनेसाठी शासनाने परवानगी दिली होती. मात्र, मुलांकडून पैसे वसूल केले आणि ते परत करण्याची पूर्तता न झाल्याने त्यांचे बील पेडिंग राहिले. मुलांना ‘ओलीस ठेवण’ अत्यंत चुकीचे आहे, असे मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले. यापूर्वी त्यांना मी सहानुभूतीपूर्वक आर्थिक मदत केली होती, परंतु डिपार्टमेंटचे नियम पाळणे आवश्यक आहे आणि चुकीचा पायंडा पाडणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

​अतिवृष्टी नुकसान भरपाई: सिंधुदुर्गचे नाव वगळले असताना प्रयत्नानंतर आठही तालुक्यांना नुकसान भरपाईचा नियम लावण्यास सांगितले गेले. कॅबिनेट बैठकीत रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तिन्ही जिल्ह्यांतील पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि कोकणातील मंत्र्यांनी मुद्दा उपस्थित केला होता. आपदग्रस्त जिल्हा म्हणून भातशेती व बागायती पिकांचे नुकसान पंचनामे झाले पाहिजेत.

​हत्ती पकड मोहीम राबविण्याची तयारी केली आहे.ओंकार हत्तीला पुढील एका आठवड्यात जेरबंद केले जाईल.बांदा आत्महत्या प्रकरणी पोलीस व्हिडिओ बघून योग्य ती कार्यवाही करतील.या पत्रकार परिषदेला आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, दिपलक्ष्मी पडते, दादा साईल, खेमराज कुडतरकर, प्रेमानंद देसाई, क्लेटस फर्नांडिस, गजानन नाटेकर, विनोद सावंत आदी उपस्थित होते.