बेकायदा पिस्तूल खरेदी-विक्री प्रकरणात शिवसेनेचा कोपरगाव शहर उपप्रमुख अनिल विनायक आव्हाड याला नगर शहरात शनिवारी रात्री तोफखाना पोलिसांनी अटक केली. त्याने एका तडीपार गुंडाकडून बेकायदा पिस्तूल खरेदी केले होते. त्यालाही अटक करण्यात आली आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील शिवाजी भुजबळ (वय २६, रा. कोपरगाव) याला १३ जुलै २०१३ रोजी नगरसह पुणे, औरंगाबाद व नाशिक या चार जिल्ह्य़ांतून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. भुजबळविरुद्ध नगरमधील बांधकाम व्यावसायिक शरद मुथा यांना खंडणी मागितल्याचा गुन्हाही कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहे. भुजबळ तडीपार असताना नगरमध्ये आल्याची माहिती तोफखान्याचे पोलीस कर्मचारी राजेंद्र वाघ यांना मिळाली. त्यांनी ही बाब उपअधीक्षक यादवराव पाटील व पोलीस निरीक्षक लक्ष्मण काळे यांच्या निदर्शनास आणली.
शनिवारी रात्री तो शहरातील प्रेमदान चौकात आव्हाडला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. तेथेच आव्हाड व भुजबळ या दोघांना पकडण्यात आले. भुजबळ आव्हाडला कशासाठी भेटणार होता, याची विचारपूस पोलिसांनी केली असता, काही दिवसांपूर्वी त्याने आव्हाडला एक पिस्तूल २४ हजार २०० रुपयांना विकल्याचे व त्यातील काही पैसे देणे बाकी राहिल्याने आव्हाड ते प्रेमदान चौकात देणार होता. पोलिसांनी आव्हाडकडून आणखी पिस्तूल व एक काडतूस हस्तगत केले. नंतर आव्हाडच्या कोपरगावमधील घरातून आणखी एक काडतूस व तलवार जप्त करण्यात आली.
उपअधीक्षक पाटील, निरीक्षक काळे, उपनिरीक्षक गोगावले, हवालदार सुरेश डहाके, अभय कदम आदींनी या मोहिमेत सहभाग घेतला. वाघ यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड व भुजबळ या दोघांना उद्या न्यायालयापुढे हजर केले जाईल.