राज्याच्या निवडणुकीची निकाल आता लागले आहेत. त्यात शिवसेना भाजपाला बहुमतही मिळालं आहे. निवडणुकीत भाजपाला १०५ जागांवर तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपा जरी मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपाला सिवसेनेची मदत घ्यावीच लागणार आहे. अशातच अनेक मुद्द्यांवरून शिवसेना भाजपामध्ये जुंपणार असल्याचीही शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. त्यात आता महाराष्ट्र आणि हरियाणामधील निकालांवरून शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र विधानसभा हरयाणासारखी त्रिशंकू नसली तरी ‘निरंकुश’ही राहणार नाही याची काळजी मतदारांनी घेतली आहे. दोन्ही ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीनेच विरोधी पक्षही प्रबळ राहील याची व्यवस्था जनतेने केली आहे. आता या राज्यांमध्ये भविष्यात नेमके काय घडेल, सत्तेचे राजकारण कोणते वळण घेईल हा मुद्दा वेगळा, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. त्यांनी सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर निशाणा साधला आहे. हरयाणा काय किंवा महाराष्ट्र काय, दोन्ही राज्यांमध्ये भौगोलिकदृष्ट्या मोठे अंतर आहे. सांस्कृतिक आणि इतर बाबतीतही ते भिन्न आहेत. मात्र दोन्ही राज्यांच्या यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी अनेक बाबतीत समानता दाखवली आहे. दोन्ही ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीनेच विरोधी पक्षही प्रबळ राहील याची व्यवस्था जनतेने केली आहे, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जे घडले तसेच हरयाणा विधानसभा निवडणुकीतही घडले आहे. तेथेही महाराष्ट्राप्रमाणे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ घटले आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ‘अब की बार २२० पार’चा त्या पक्षाचा नारा चालला नाही तसाच हरयाणातही ‘अब की बार ७५ पार’ या घोषणेप्रमाणे त्या पक्षाला जागा मिळाल्या नाहीत. भाजपचा घोडा ४० वरच अडला. काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली होणार नाही हा अंदाज हरयाणातही खोटा ठरला. उलट त्या पक्षाने तेथे थेट ३१ जागांपर्यंत मुसंडी मारली आहे. महाराष्ट्रात हा पक्ष ‘नेतृत्वहीन’ अवस्थेत निवडणूक लढला तरीही ४५ जागा मिळवून त्या पक्षाने आपले अस्तित्व आणखी ठळक केले. हरयाणात तर काँग्रेस पक्ष फक्त ठळकच नव्हे तर प्रबळ दावेदार म्हणूनच पुढे आला आहे. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळून १०० च्या आसपास संख्याबळ झाले आहे. म्हणजे महायुतीला बहुमताचे ‘बळ’ देतानाच येथील जनतेने एका प्रबळ विरोधी आघाडीचीही पुढील पाच वर्षांसाठी व्यवस्था केली आहे. हरयाणातदेखील काँग्रेसच्या पारड्यात ३१ जागा टाकून तेथील मतदारांनी हाच कित्ता गिरवला आहे. हरयाणात काँग्रेस सत्तेत येईल वा येणार नाही, पण नव्या सरकारला पूर्वीसारखा मुक्तपणे कारभार करणे शक्य होणार नाही इतपत ताकद मतदारांनी काँग्रेस पक्षाला दिली आहे. म्हणजे महाराष्ट्रात जी भूमिका काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसने पार पाडावी असे जनतेला वाटले तोच विचार हरयाणातील मतदारांनी काँग्रेसबाबत केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena criticizes bjp over government formation in maharashtra and haryana maharashtra vidhan sabha election 2019 jud
First published on: 26-10-2019 at 13:55 IST