शिवसेना पक्षाचा आज ५८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. शिवसेनेतील फूटीनंतर आता दोन वेगवेगळे वर्धापन दिन साजरे करण्यात आले आहेत. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन षण्मुखानंद सभागृहात साजरा करण्यात आला. तर दुसरीकडे वरळीच्या एनआयसी येथे शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची उपस्थित होते. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला.

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

“दोन वर्षापूर्वीचा जून महिना आपल्याला आठवत असेल. दोन वर्षांपूर्वी उठाव झाला. त्या उठावाने महाराष्ट्रात आणि देशात इतिहास घडला. त्या इतिहासाचे शिलेदार हे एकनाथ शिंदे होते. त्यांनी या महाराष्ट्रात शिवशाही स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मी अनेक वर्षांपासून निवडणुका पाहत आलो आहे. त्या निवडणुकांमध्ये असणारे प्रश्न हे शेतीचे असायचे. शेतीच्या पिकाच्या भावाचे मुद्दे असायचे. पाण्याचे प्रश्न असायचे. मात्र, या निवडणुकीमध्ये असे काही मुद्दे पाहायला मिळाले नाही. या निवडणुकीमध्ये फक्त अफवा, अफवा आणि अफवा पसरवल्या गेल्या. चुकीच्या गोष्टी सांगण्यात आल्या. अशा पद्धतीचं चित्र निर्माण करण्यात आलं, असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला.

हेही वाचा : “बऱ्याच वर्षांपासून गृहखातं असल्याने, त्यांचा अन्…”; फडणवीसांच नाव न घेता भास्कर जाधवांची खोचक टीका!

“ज्या जागा आपल्या निवडून आल्या आणि त्यांचं मतदान पाहिले तर ज्या भागात शिवसेनेला कधी मतदान मिळालं नाही त्या भागात ठाकरे गटाला मतदान झाले. मला आनंद वाटला की उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा काँग्रेसला मतदान केलं. बाळासाहे ठाकरे यांना काय वाटलं असेल. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान केलं. याच्यासारखा दुर्देवी दिवस कोणता नाही. त्यांचे ९ खासदार निवडून आले हे माहिती आहे. पण महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकाल लागले आहेत, ते पाहिले तर त्या निकालामध्ये काही मतांची वजाबाकी केली तर ९ नाही तर एकही खासदार निवडून आला नसता”, असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, “आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला सामोर जायचं आहे. त्या निवडणुकीत ज्या जागा आपल्याला मिळतील त्या जागांसाठी आपल्याला आत्तापासून लढावं लागणार आहे. त्यांच्या अफवाचं चित्र जास्त काळ टिकणार नाही. अफवाचे फुगे जास्त दिवस टिकणार नाही. आपल्या ७ जागा निवडून आल्या असल्या तरी आता विधानसभेच्या कामाला लागायचं आहे. काही ठिकाणी आपल्या कमी जागा आल्या. पण जीवन मे गिरना भी अच्छा है, औकात का पता चलता है, बढ़ते हैं जब हाथ उठाने को, अपनों का पता चलता है”, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला.