Arjun Khotkar : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. खरं तर या निवडणुकीत महायुतीने तब्बल बहुमतापेक्षा जास्त जागा मिळवल्या. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे. पुढील काही दिवसांत सरकार स्थापन होईल. सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये हालचाली सुरु आहेत. पण मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यासाठी दिल्लीत उद्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार अशा तिन्ही नेत्यांची भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीच्या सरकारचा फॉर्म्युला ठरणार असल्याची चर्चा आहे.

तसेच महायुतीचा मुख्यमंत्री कोण असेल? यावरही उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीच्या आधी एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपाचे दिल्लीतील नेते जो निर्णय घेतील तो मान्य असेल अशी भूमिका जाहीर केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी मोठं विधान करत आम्हाला अद्यापही अपेक्षा आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : “एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला नाही, तर…”, ठाकरे गटाचा मोठा दावा

अर्जून खोतकर काय म्हणाले?

“एकनाथ शिंदे यांनी त्यांचा निर्णय हे वरिष्ठ पातळीवर टाकला आहे. मग निर्णय कोणता होईल हे सांगता येत नाही, त्यामध्ये निर्णय आमचाही होऊ शकतो. एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे. मग तो निर्णय काहीही असू शकतो”, असं अर्जून खोतकर यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर भाजपाचा मुख्यमंत्री झाला तर एकनाथ शिंदे कोणती जबाबदारी स्वीकारतील? असा प्रश्न अर्जून खोतकर यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, “याबाबत मी काही सांगू शकत नाही. मात्र, आम्हाला अद्याप अपेक्षा आहे. कारण अद्याप याबाबतचा निर्णय झालेला नाही. एकनाथ शिंदेंनी हे सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील. मग तो निर्यण आमच्या बाजूने राहिल किंवा त्यांच्या बाजूने होईल”, असं सूचक विधान अर्जून खोतकर यांनी केलं आहे.