उर्दू भाषेतील फलक फाडून तोडफोड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगरपालिकेच्या इमारतीवर लावलेला उर्दू भाषेतील फलक फाडून घोषणाबाजी करत पालिकेच्या इमारतीवर चढलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पालिकेच्या आतील भागात कक्षांची तोडफोडही केल्याने येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मोठा बंदोबस्त तनात केल्याने पालिकेला छावणीचे स्वरुप आले.

बीड नगरपालिकेत गुरुवारी शिवसनिकांनी राडा केला. काकू नाना विकास आघाडी व एमआयएमच्या नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी पालिकेच्या इमारतीवर उर्दू भाषेतील फलक लावला होता. त्यावरुन शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्यासह शिवसनिकांनी मुख्याधिकारी धनंजय जावळीकर यांना निवेदन देऊन उर्दू फलक हटविण्याची मागणी केली. मुख्याधिकाऱ्यांना भेटून बाहेर येत असतानाच शिवसनिक दुसऱ्या मजल्यावर गेले. इमारतीच्या दर्शनी भागावर लावण्यात आलेला उर्दू भाषेतील फलक फाडून खाली फेकून दिला. छतावर असलेले नादुरुस्त दिवे, पथदिव्यांचीही तोडफोड केली. पालिकेच्या आतील भागातील दोन कक्षांच्या काचा फोडत जोरदार घोषणाबाजी केली. या प्रकाराची माहिती कळताच आघाडीसह एमआयएमच्या नगरसेवकांनी धाव घेऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली. उर्दू फलक फाडून फेकून दिल्यामुळे मोठा जमावही त्याठिकाणी आला होता. पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांच्यासह दंगल नियंत्रण पथकही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पालिकेच्या आवारातील गर्दी पांगवत शांततेचे आवाहन केले. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासून फलक हटवणाऱ्या आणि तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार असल्याचे जावळीकर यांनी सांगितले. पालिकेच्या इमारतीवर उर्दू फलक उभारण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. ठराव घेऊनच फलक बसवण्यात आलेला असताना तो काढण्याचा अधिकार शिवसेनेला कोणी दिला, असा सवाल उपस्थित करत एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख निजाम यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena in beed municipal corporation
First published on: 04-08-2017 at 00:47 IST