शिवसेना नेते आणि प्रवक्ते भास्कर जाधव यांनी आज भाजपा नेते किरीट सोमय्या आणि आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची रवी राणा यांनी घोषणा केल्यापासून राज्यातील वातावरण तापलं होतं. त्यानंतर बराच गदारोळ झाला, शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. अखेर आमदरा रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दाम्पत्यास अटक झाली. त्या दिवशी भाजपा नेते किरीट सोमय्यांनी खार पोलीस स्टेशन गाठले तेव्हा त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भास्कर जाधव म्हणाले, “भाजपा आरोप-प्रत्यारोपांशिवाय दुसरं करतयं काय? भाजपाच्या हातात जे सरकार आहे, त्या सरकारच्या माध्यमातून या देशात चांगल्या प्रकारचं वातावरण निर्माण करणं, महागाई कमी करणं, डिझेल-पेट्रोलचे दर कमी करणे, तरुणांच्या हाताला काम देणं, नवनवीन उद्योग निर्माण करणं, आज देशाच्या जवळील राष्ट्र हे आपल्यापासून दूर गेलेली आहेत. जी लांबची राष्ट्र आहेत त्यांना आम्ही जवळ करतोय आणि देशाच्या सीमेच्या लगतची राष्ट्र ही आपल्यापासून दूर गेलेली आहेत. आज श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती काय बोलते? आज चर्चा अशी आहे की श्रीलंकेची जी परिस्थिती झाली तीच परिस्थिती आजच्या भाजपच्या सरकारच्या नेतृत्वाखाली काही वर्षानंतर या देशाची होणार नाही. यावर का भाजपा बोलत नाही? अन्य विषयांवर का भाजपा बोलत आहे? यावर बोललं पाहिजे.”

…हे भाजपाच्या लोकांचं रचलेलं षडयंत्र आहे –

तसेच, “भाजपाने मागील अडीच वर्षात हे सरकार या दिवशी पडेल, या तारखेला पडेल, या वेळेला पडेल असे अनेक मुहूर्त सांगितले. अनेक दिवस सांगितले. अनेकदा सरकार पडेल म्हणून देखील घोषणा केल्या. सर्व प्रकारे प्रयत्न करून देखील हे महाविकास आघाडीचं सरकार दिवसेंदिवस मजबूत होत चाललं आहे. यातून भाजपाचे सगळे नेते हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत. जसं मी पुन्हा येईन, पुन्हा येईन परंतु पुन्हा येता आलं नाही. तसं ते दिल्लीश्वरांना सांगून आले की काय, की आम्ही महाविकास आघाडीचं सरकार चार दिवसांत, आठ-दहा दिवसांत पाडू आणि ते सरकार त्यांना पाडता आलं नाही. म्हणून त्यांनी शेवटी महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था सामाजिक स्वास्थ आणि त्याचबरोबर महाराष्ट्राला विकासापासून दूर नेण्याचं, हे भाजपाच्या लोकांचं रचलेलं षडयंत्र आहे. यापेक्षा याला फार महत्व नाही.” असं भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे म्हटलं.

…ही किरीट सोमय्यांची जुनी खोड आहे –

याचबरोबर, “किरीट सोमय्यांवर दगड हल्ला झाला की त्यांनी तो स्वत: घडवून आणला? हा पहिल्यांदा संशोधनाचा भाग आहे. रात्री साडेनऊ वाजता तिथे जाण्याचं किरीट सोमय्यांच काय काम होतं? ते कशासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते? एखाद्या आरोपीला अटक झाली, तर नियामनुसार त्याचे वकील किंवा त्याचे नातेवाईक पोलीस स्टेशनला जाऊ शकतात. रवी राणा हे किरीट सोमय्यांचे कोण आहेत? त्यांचं काय नातं आहे? हे एकदा महाराष्ट्राला कळालं पाहिजे. जाणीवपूर्वक परिस्थिती बिघडवण्यासाठी स्वत:हूनच एखादा कट रचून, स्टंटबाजी करणं आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणं, ही किरीट सोमय्यांची जुनी खोड आहे. म्हणून मला असं वाटतं की या मागे कुठलाही पक्ष नाही, शिवसेना नाही महाविकास आघाडी नाही, तर स्वत: किरीट सोमय्यांनी रचलेला हा प्लॅन असावा आणि त्यांना अपेक्षित असलेली गाडीची काच फोडून त्यांनी स्टंटबाजी केलेली असावी, यापेक्षा दुसरा त्याला काही अर्थ नाही. परंतु पहिल्यांदा किरीट सोमय्या तिथे जाणीवपूर्वक का गेले होते? पंतप्रधान महाराष्ट्रात येत असताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम किरीट सोमय्यांनी केलं आहे, म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.” अशा शब्दांमध्ये त्यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला.

बाळासाहेबांनी तुझ्यासारखा फडतूस माणसाला… –

तर, “ कोण हा रवी राणा, बाळासाहेबांनी तुझ्यासारखा फडतूस माणसाला शिवसैनिक कधीच करून घेतला नसता. हनुमान चालीसा वाचून जर बिघडलेली संपूर्ण परिस्थिती सुधारणार असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा वाच. म्हणजे लोकांना पंतप्रधानांनी कबूल केल्याप्रमाणे १५-१५ लाख रुपये मिळतील. पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. नोटांबंदीमुळे रांगेत उभा राहून मृत्यू झालेल्यांना न्याय मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. तू भाजपाचा समर्थक आहे, शिवसेनेची काळजी तू कशाला करतोस?” असं म्हणत भास्कर जाधव यांनी आमदार रवी राणावर टीका केली आहे.