एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. बंडामुळे शिंदे आणि शिवसेनेत मोठी फूट निर्माण झाली आहे. अखेर भाजपाशी युती करत शिंदेंनी राज्यात सत्ता स्थापन केली. सुरुवातीला शिवसेना आमदार आणि आता नगरसेवक, पदाधिकारीही एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आहे. तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावला आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध बिघडल्याचे दिसत असतानाच दुसरीकडे शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या ट्वीटने दोघे पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा- ‘…तोपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’; संजय राऊतांची ट्वीट करत मागणी

येत्या दोन दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे चर्चेसाठी एकत्र येणार असल्याचं ट्वीट सय्यद यांनी केलं आहे. या ट्वीटमुळे राजकीय वर्तृळात खळबळ उडाली आहे. आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येणार? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे.

भाजप नेत्यांची मदत
महत्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे चर्चेसाठी एकत्र यावे याकरीता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मध्यस्ती केल्याचे दिपाली सय्यद यांनी ट्वीटमध्ये म्हणले आहे. त्यामुळे त्यांनी भाजपा नेत्यांचेही आभार मानले आहे.

हेही वाचा- “…तर संजय राऊतांनी गजनी सिनेमा बघावा”; आशिष शेलारांचा खोचक सल्ला

सय्यद यांचे आणखी एक सूचक ट्वीट
दिपाली सय्यद यांनी आणखी एक ट्वीट करत मोठा संकेत दिला आहे. ‘लवकरच माननीय आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे, शिवसेनेच्या ५० आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील’.