जागतिक महिला दिनी ग्लिडेन या फ्रेंच डेटिंग अ‍ॅपने महिलांच्या डेटिंगबद्दलचा एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालाची सध्या चर्चा होत असून, त्यात ४८ टक्के विवाहित महिलांचे विवाहबाह्य संबंध असल्याचं म्हटलेलं आहे. ग्लिडेन या डेटिंग अ‍ॅपच्या अहवालावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. विधान परिषदेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिला दिनी विधान परिषदेत बोलताना आमदार मनिषा कायंदे यांनी या ग्लिडेनच्या सर्वेकडे लक्ष वेधलं. त्या म्हणाल्या,”आज महिला दिन आहे आणि आपण भारतीय महिलांच्या यशोगाथा वाचत असतो, ऐकत असतो. त्याचा उहापोह करतो आणि नेमकं अशाच दिवशी एक फ्रेंच अ‍ॅप आहे, ग्लिडेन नावाचं. या अ‍ॅपने असं म्हटलं आहे की, त्यांनी ६० कोटी लोकांचा सर्वे केला आहे. त्यात भारतीय महिलांचा देखील सर्वे केला आहे. मूळात हा अ‍ॅप एक डेटिंग अ‍ॅप आहे. ६० टक्के महिलांपैकी ४८ टक्के महिला विवाहबाह्य संबंध ठेवतात. भारतीय महिलांना बदनाम करण्याचा हा प्रकार आहे,” असं कायंदे म्हणाल्या.

“शेतकरी, कष्टकरी महिला आहेत. कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या महिला आहेत. नेमकं महिला दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी जो काही तथाकथित निष्कर्ष मांडला आहे. तो घृणास्पद आणि निंदनीय आहे. हे भारतीय महिला खपवून घेणार नाही. खोटारडा सर्वे आहे, यात महिलांची बदनामी करण्यात आली आहे. अ‍ॅपचा सर्वे त्यांनी वृत्तपत्रातही प्रसिद्ध केला आहे. मार्केटिंग करण्यासाठी त्यांनी हे केलं असून, त्यासाठी भारतीय महिलांची बदनामी करणं निंदनीय आहे. चूल मूल सांभाळून महिला घराबाहेर पडतात. या अ‍ॅपवर बंदी आणावी, तसे निर्देश द्यावे,” अशी मागणी कायंदे यांनी केली आहे. त्यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी या अ‍ॅपवर बंदी घालण्यासंदर्भात केंद्राशी चर्चा करावी असे निर्देश राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना दिले आहेत.

काय म्हटलं आहे सर्वेत?

ग्लिडेन या ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपने भारतीय महिलांचा सर्वे केला. त्याची निरीक्षण त्यांनी नोंदवली आहेत. त्यानुसार विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांपैकी ४८ टक्के महिला या मॉम म्हणजेच आई आहेत. अशा संबंधात असलेल्या ७८ टक्के महिला या उच्च शिक्षित आहेत, तर ७४ टक्के महिला या नोकरी व्यवसायात उच्चपदावर कार्यरत आहेत. विवाहबाह्य संबंधामुळे आधी अपराधी भावना येत होती, पण आता ती येत नसल्याचं विवाहबाह्य संबंधात असलेल्या महिलांचं म्हणणं आहे, असंही ग्लिडेनने अहवालात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mlc seeks ban on dating app for carrying out survey on extra marital affairs bmh
First published on: 09-03-2021 at 08:57 IST