शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणाचे अधिकृत प्रभारी कुणीही असले तरी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर खासदार अनंत गीते सर्व सूत्रे हलवू लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
पूर्वीच्या रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले गीते मागील निवडणुकीपासून रायगड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या मतदारसंघामध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली आणि गुहागर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्य़ातील शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. जिल्ह्य़ातील त्यांचे कट्टर विरोधक व माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम नुकतेच राजकारणात सक्रिय झाले. त्यापाठोपाठ कदम यांचे निष्ठावान समर्थक शशिकांत चव्हाण यांची शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदावरून उचलबांगडी करण्यात आली. हा निव्वळ योगायोग नसून त्यामागे खासदारांची खेळी असल्याचा आरोप कदमांच्या गोटातून केला जात आहे. कारण या पदावर गीतेंचे कट्टर समर्थक सचिन कदम यांची वर्णी लागली आहे.
गीते यांनी आधी रत्नागिरीचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व करून त्यानंतर रायगड मतदारसंघामधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. ए. आर. अंतुले यांचा पराभव केल्यामुळे ‘मातोश्री’वर त्यांच्या शब्दाला वजन आहे. त्या तुलनेत मागील विधानसभा निवडणुकीनंतर पराभूत झालेले कदम राजकीय विजनवासात गेले होते. स्वाभाविकपणे गीते यांची रायगडसह रत्नागिरीच्या पक्षसंघटनांवर पकड जास्त मजबूत झाली. चिपळूणचे सेना आमदार सदानंद चव्हाण हेही त्यांचेच समर्थक आहेत. कदम सक्रिय होऊ लागल्याचे लक्षात येताच या परिस्थितीचा राजकीय लाभ उठवत गीतेंनी त्यांचे निकटवर्ती चव्हाण यांची उचलबांगडी करवून कदमांना मागे रेटण्याचा प्रयत्न केला आहे.  
कोकणातील चाकरमानींची मुंबईशी पूर्वापार नाळ जोडलेली असून त्यामध्ये कुणबी समाजाच्या शेतकरी-कष्टकरी वर्गाचे प्रमाण जास्त आहे. या सामाजिक-राजकीय स्थितीचा वापर खुबीने करून घेत गीतेंनी पक्षसंघटनेवर आपली मांड बळकट केल्याचे मानले जात आहे.
गुहागर आणि चिपळूण या दोन्ही मतदारसंघांमध्ये सेनेची राजकीय लढाई राष्ट्रवादी काँग्रेसशी असून गुहागरचे आमदार व माजी मंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्षपदी नेमले आहे. त्यामुळे या ठिकाणी सेनेला कडवे आव्हान निर्माण झाले आहे.
 या पाश्र्वभूमीवर सेनेच्या जिल्हाप्रमुखपदी आपल्या विश्वासातील व्यक्ती आणून गीतेंनी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने बांधणी सुरू केली आहे.
गेल्या आठवडाभरातील या घडामोडींमुळे अतिशय अस्वस्थ झालेले रामदास कदम किंवा शशिकांत चव्हाण अन्य पक्षामध्ये जाण्याच्या वावडय़ाही उठू लागल्या आहेत. उत्तर रत्नागिरी जिल्ह्य़ातील अनेक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.
पण या बंडाचा परिणाम चिपळूण-गुहागर-खेड तालुक्यांबाहेर फारसा दिसून येत नाही. सेनेचे दापोलीचे सूर्यकांत दळवी यांचे खासदार गीतेंशी सख्य असल्यामुळे त्या भागातून या बंडाला फारसा पाठिंबा मिळालेला नाही. दरम्यान कदम आणि चव्हाण यांनी अन्य पक्षामध्ये जाण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onकोकणKonkan
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mp anant gite will handle konkan for upcoming election
First published on: 10-07-2013 at 02:40 IST