शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या २५ नोव्हेंबरच्या अयोध्या दौऱ्यावरुन शिवसेनेतील दोन नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे वृत्त आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्येतील सभेला अद्याप उत्तर प्रदेश सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे अयोध्येत सभा घ्यायची की नाही, यावरुन एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यात मतभेद असल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यात मतभेद आहेत. उद्धव ठाकरे हे अयोध्येत राम जन्मभूमीवर रामलला येथे दर्शन घेतल्यानंतर शरयू नदी किनारी आरती करणार आहेत.
उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यात जाहीर सभा देखील घेणार असून या सभेला अद्याप उत्तर प्रदेश सरकारने परवानगी दिलेली नाही.

खासदार संजय राऊत हे गेल्या महिनभरापासून अयोध्या दौऱ्याची तयारी करत आहेत. संजय राऊत हे यासाठी उत्तर प्रदेशलाही जाऊन आले. उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा करावा, मात्र जाहीर सभा घेऊ नये, असे संजय राऊत यांना वाटते. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरे यांनी सभा घ्यावी, असे मत आहे. या वृत्तावर शिवसेनेच्या वतीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

संजय राऊत आणि सचिव मिलिंद नार्वेकर हे सध्या उत्तर प्रदेशमध्ये आहेत. सोमवारी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतली. मंगळवारी ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. राम नाईक यांची भेट घेतल्यानंतर शिवसेनेला या सभेसाठी परवानगी मिळेल, अशी दाट शक्यता आहे.

संजय राऊत यांना काय वाटते?

संजय राऊत यांच्या मते उद्धव ठाकरे यांनी अयोध्य रामललाचे दर्शन घ्यावे आणि नंतर हिंदू धर्मगुरुंची भेट घ्यावी. या ठिकाणी सभा घेणे कठीण असल्याचे राऊत यांचे मत असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

एकनाथ शिंदेना काय वाटते?

अयोध्येत उद्धव ठाकरे यांनी सभा घ्यावी, असे एकनाथ शिंदे यांना वाटते. सभेसाठी एकनाथ शिंदे राज्यातील शिवसैनिकांनाही अयोध्येत नेण्याचे नियोजन करत असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

सभेचा तिढा काय?
अयोध्येत उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यावरुन उत्तर प्रदेश प्रशासनासमोर पेच उभा राहिला आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी दिल्यास अन्य हिंदुत्ववादी संघटनाही अयोध्येत जाहीर सभेसाठी परवानगी मागतील, असे प्रशासनाला वाटते. त्यामुळे सभेला सशर्त परवानगी मिळेल, असे सांगितले जाते.

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे वेळापत्रक
उद्धव ठाकरे २४ नोव्हेंबर रोजी अयोध्येत संध्याकाळी सव्वा पाच वाजता आरती करतील. याआधी ते लक्ष्मण किला येथे जातील. तिथे हिंदू धर्मगुरुंची भेट घेतील. २५ नोव्हेंबर रोजी ते राजजन्मभूमीला भेट देतील. यानंतर पत्रकार परिषद आणि दुपारी एक वाजता जाहीर सभा घेतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena party chief uddhav thackeray ayodhya visit sanjay raut eknath shinde divide over public rally
First published on: 20-11-2018 at 11:01 IST