शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याची स्तुती करत त्यांना भारतरत्न देण्याच्या मागणीचे समर्थन केलं. त्या काळी सावरकर जर देशाचे पंतप्रधान असते तर आज पाकिस्तानच जन्मालाच आला नसता असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान, त्यांनी सावरकर यांचा भारतरत्न देऊन गौरव करण्याची मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सावरकर: इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. “आमचं सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा भारतरत्न पुरस्काराने गौरव केला पाहिजे. आम्ही महात्मा गांधी आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलेले कार्य नाकारत नाही,” असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. यापूर्वीही ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती.

“देशासाठी काही काळ नेहरूंनी तुरूंगवास भोगल्याचे राहुल गांधी म्हणाले होते. मी त्यांना सागू इच्छीतो की सावरकर यांनी 14 वर्षांचा तुरूंगवास भोगला आहे आणि त्यांनी मरणयातनादेखील भोगल्या आहेत. जर नेहरूंनी अशा यातना भोगल्या असत्या आणि ते 14 मिनिटांसाठी जरी तुरूंगात गेले असते तरी त्यांना नायक म्हणण्यास आमची हरकत नव्हती,” असंही ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. तसंच त्यांना या पुस्तकाची प्रत दिली पाहिजे, असंही ते म्हणाले.

“सावरकर यांना ज्या तुरूंगात ठेवण्यात आलेलं त्याचा आज पिकनिक स्पॉट करण्यात आला आहे आणि हे अतिशय दुर्देवी आहे. काही लोकांसाठी तुरूंग हा पिकनिक स्पॉटच झाला आहे. परंतु सावरकरांनी तुरूंगात असताना किती यातना भोगल्या हे लोकांना माहित नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena party chief uddhav thackeray if sawarkar was pm pakistan wont even born mumbai maharashtra jud
First published on: 18-09-2019 at 07:29 IST