नगर महापालिका महापौर निवडणूक

उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी आज अर्ज दाखल करणार

नगर : महापालिकेतील सत्तेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केल्यानंतर शिवसेनेच्या रोहिणी संजय शेंडगे यांनी आज, सोमवारी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी उपमहापौर पदासाठी उद्या, मंगळवारी अर्ज दाखल करणार आहे. दरम्यान स्थानिक पातळीवर आघाडी करताना काँग्रेसला विचारात न घेतल्याने तसेच राष्ट्रवादीशी आघाडी केल्याने सेनेचा एक गट नाराज आहे. परंतु सेना व राष्ट्रवादीचे एकत्रित संख्याबळ विचारात घेता या नाराजीमुळे फारसा फरक पडणार नसला तरी प्रत्यक्षात नाराजी किती प्रमाणात उघड होणार की निवड बिनविरोध होणार याकडे नगरकरांचे लक्ष राहील.

दरम्यान महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची उद्या, मंगळवारी अंतिम मुदत आहे. आज शिवसेनेच्या श्रीमती शेंडगे यांनी महापौर पदासाठी चार उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून पुष्पा बोरुडे, सुरेखा कदम, अशोक बडे व सुवर्णा गेनप्पा तर अनुमोदक म्हणून अनिल शिंदे, गणेश कवडे, विजय पठारे व विद्या खैरे यांच्या सह्य आहेत. महापौरपद अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे.

भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांच्या पदाची मुदत बुधवारी संपते आहे. शिवसेनेला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देत सत्ता मिळवून दिली होती. आता राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची महाविकास आघाडी झाल्याने तसेच भाजपकडे आरक्षित जागेवरील उमेदवार नसल्याने राष्ट्रवादीपुढे शिवसेनेबरोबर जाण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. त्यातच शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आघाडी करण्याची सूचना केल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेतील नाराजांनाही पर्याय राहिला नाही.

श्रीमती शेंडगे यांचा महापौरपदासाठी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, सेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, सभापती अविनाश घुले तसेच नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. महापौर व उपमहापौर पदाची निवड सभा बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे.

उपमहापौरपदासाठी कोण?

उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार मंगळवारी अर्ज दाखल करणार आहे. या पदासाठी राष्ट्रवादीमध्ये गणेश भोसले, मीना चोपडा व विनित पाऊलबुधे असे तिघे इच्छुक आहेत. मात्र अंतिम निर्णय राष्ट्रवादीचे शहरातील सर्वेसर्वा आमदार संग्राम जगताप घेणार आहेत. त्यामुळे उद्या कोणाचा अर्ज दाखल होतो, याबद्दल उत्सुकता आहे.

सामाजिक अंतर नियमाचा फज्जा

महापौर पदासाठी श्रीमती शेंडगे यांचा अर्ज दाखल करताना सेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असले तरी या गर्दीमुळे सामाजिक अंतराच्या निकषाचा फज्जा उडाला होता. गर्दीतील अनेकांनी मुखपट्टीचा वापर केलेला नव्हता. महापालिकेच्या मुख्यालयातच असे चित्र निर्माण झाल्याने नगरकरांपुढे वेगळा संदेश गेला आहे.

काँग्रेसच्या शीला चव्हाण अर्ज दाखल करणार का?

काँग्रेसच्या शीला दीप चव्हाण यांनी महापौर व उपमहापौर या दोन्ही पदांचे अर्ज नेले आहेत. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्यापर्यंत आहे. राज्यात सत्तेत शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस यांची महाविकास आघाडी असली तरी स्थानिक पातळीवर केवळ सेना व राष्ट्रवादी यांनीच आघाडी केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आघाडीत काँग्रेसचा विचार झाला नसल्याचे स्पष्ट होते. काँग्रेसचे मनपातील संख्याबळ केवळ  ५ आहे. मात्र त्यातील किमान तिघेजण राष्ट्रवादीशी संलग्न आहेत. त्यामुळे चव्हाण अर्ज दाखल करणार का, असा प्रश्नही केला जात आहे.

महापौर पदासाठी शिवसेनेच्या रोहिणी संजय शेंडगे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आ. संग्राम जगताप, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.