राज्यातील सत्ता समीकरणानंतर ताणलेल्या संबंधामुळे अखेर युतीचा पोपट अधिकृतरित्या मरण पावला. शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा भाजपाकडूनच करण्यात आली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली होती. शिवसेनेच्या मंत्र्याने राजीनामा दिला आहे. एनडीएच्या ते बैठकीलाही आले नाहीत. त्यांच्यासाठी विरोधी बाकांवर बसण्याची सोय केली जात आहे,” असंही ते म्हणाले. यावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापू लागलं आहे. आम्हाला एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण? असा सवाल शिवसनेकडून करण्यात आला आहे. ‘एनडीए’ची स्थापना केली त्यांनाच घराबाहेर काढण्याची हीन व नीच घोषणा या मंडळींनी केली. साधी चर्चा नाही, चिठ्ठीचपाटी नाही. ज्या ‘एनडीए’चे अस्तित्वच मागच्या साडेपाच वर्षांत पद्धतशीरपणे नष्ट केले त्या ‘एनडीए’तून म्हणे शिवसेनेस बाहेर काढले. अहंकारी आणि मनमानी राजकारणाच्या अंताची ही सुरुवात आहे. हिंमत असेल तर या अंगावर. आम्ही तयार आहोत, अशा शब्दात शिवसेनेनं भाजपावर तोफ डागली आहे.

सर्वजण मोदी यांच्या विरोधात होते. त्यावेळी शिवसेनेने त्यांचा वचाव केला होता. त्याच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघटनेला शिवसेना प्रमुखांच्या पुण्यतिथीलाच भाजपानं बाहेर काढलं. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी राजांचा आहे अशा मंबाजींना तो साथ देणार नाही. मंबाजींच्या राजकारणाची उलटी गिनती सुरू झाली आहे, अशा शब्दात शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला. शिवसेनेने सामनातील अग्रलेखातून या प्रकारावर टीका केली आहे. ज्या वाकडतोंड्याने ही घोषणा केली त्याला शिवसेनेचे मर्म आणि ‘एनडीए’चे कर्म–धर्म माहीत नाही. तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या घुगऱ्या शिवसेनेने खाल्ल्या आहेत. ‘एनडीए’च्या जन्मकळा व बाळंतपणाच्या वेदना शिवसेनेने अनुभवल्या आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वाऱ्यालाही कुणी उभे राहायला तयार नव्हते आणि हिंदुत्व, राष्ट्रवाद या शब्दांना देशाच्या राजकारणात कुणी विचारीत नव्हते, तेव्हा आणि त्याआधीही जनसंघाच्या पणतीत तेल ओतण्याचे कार्य शिवसेनेने केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेनेस बाहेर काढण्याची भाषा करणाऱ्यांनी तर इतिहास समजून घेतला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, पंजाबचे बादल अशा दिग्गजांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पाया घातला तेव्हा आजचे ‘दिल्लीश्वर’ गोधडीत रांगतसुद्धा नसावेत. काहींचा तर जन्मही झाला नसावा, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

काय म्हटलं अग्रलेखात ?
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत यापुढे शिवसेना नसल्याचे परस्पर जाहीर करण्यात आले आहे. दिल्लीतील भाजपा धुरिणांनी कशाच्या आधारावर आणि कुणाच्या परवानगीने ही घोषणा केली? ‘प्रवासातील अतिघाई अपघाताला आमंत्रण देई’ तशी ही अतिघाई या मंडळींना नडल्याशिवाय राहणार नाही. नव्हे ती नडलीच आहे. दिल्लीच्या मोदी मंत्रिमंडळातील कुणी एक प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले की, काँग्रेस व राष्ट्रवादीशी शिवसेनेचे संबंध जुळल्यामुळे ‘एनडीए’तून बाहेर काढले आहे व त्यांच्या खासदारांच्या संसदेतील जागा बदलून विरोधी पक्षांच्या बाकांवर त्यांना बसवण्यात आले आहे.

जॉर्ज फर्नांडिस हे ‘एनडीए’चे निमंत्रक होते व आडवाणी हे प्रमुख होते. आज ‘एनडीए’चे प्रमुख किंवा निमंत्रक कोण आहेत याचे उत्तर मिळेल काय? आता शिवसेनेस बाहेर काढण्याचा निर्णय कोणत्या बैठकीत आणि कोणत्या आधारावर घेतला? हे सर्व प्रकरण इतक्या विकोपास का गेले? यावर ‘एनडीए’च्या घटक पक्षांची बैठक बोलावून चर्चा घडवून हा निर्णय झाला आहे काय? कुणी तरी एक वाकडतोंड्या उपटसुंभ उठतो व शिवसेनेस ‘एनडीए’तून बाहेर काढण्याची घोषणा करतो. सारा देश बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करत असतानाच ज्यांनी ‘एनडीए’ची स्थापना केली त्यांनाच घराबाहेर काढण्याची हीन व नीच घोषणा या मंडळींनी केली. अहंकारी आणि मनमानी राजकारणाच्या अंताची ही सुरुवात आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राशी घेतलेला हा पंगा तुमचा तंबू उखडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे वचन आम्ही या निमित्ताने पंगा घेणाऱ्यांना देत आहोत.

पैसा व सत्तेचा माज शिवरायांच्या मातीत चालत नाही याचा अनुभव कालच्या विधानसभा निवडणुकीत आलाच आहे. शिवरायांचा महाराष्ट्र पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना सहजासहजी सोडणार नाही. भारतीय जनता पक्षाचा बोभाटा आहे की शिवसेनेने काँग्रेसबरोबर संबंध जोडले आहेत. शिवसेनेच्या प्रखर माऱ्यापुढे तुमचे ढोंग टिकले तर ना! कश्मीरात राष्ट्रद्रोही तसेच पाकड्यांचे गोडवे गाणाऱ्या मेहबुबा मुफ्तीशी सत्तेसाठी निकाह लावताना भाजपने ‘एनडीए’ची परवानगी घेतली होती काय? पाक पुरस्कर्त्यांना ‘एनडीए’च्या बैठकीत मानाच्या खुर्च्या देताना परवानगी घेतली होती काय? नरेंद्र मोदी यांना विरोध करणाऱ्या, मोदी यांच्यावर जहरी टीका करणाऱ्या नितीश कुमारांच्या कमरेवर पुन्हा ‘एनडीए’चे लंगोट बांधताना तुम्ही आमची परवानगी घेतली होती काय? स्वतःस हरिश्चंद्राचा अवतार मानणाऱ्यांनी हरिश्चंद्रासारखे वर्तन केले नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी राजांचा आहे अशा मंबाजींना तो साथ देणार नाही. मंबाजींच्या राजकारणाची उलटी गिनती सुरू झाली आहे.