Sanjay Shirsat : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप होऊन एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र, अद्यापही महायुती सरकारने पालकमंत्री पदाच्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. यातच पालकमंत्री पदावरून महायुतीच्या मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, आता पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मात्र, याबाबत आता शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं भाष्य केलं आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होईल? आणि राज्यभरातील पालकमंत्र्यांची यादी कधी जाहीर होईल? याबाबतही संजय शिरसाट यांनी भाष्य केलं आहे. पुढच्या दोन दिवसांत पालकमंत्र्यांची यादी जाहीर होणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होईल? हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील असंही ते म्हणाले.

संजय शिरसाट काय म्हणाले?

शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पादाबाबत मोठं भाष्य केलं होतं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला बाहेरील पालकमंत्री नेमण्यात येण्याची शक्यता आहे, असं विधान केलं होतं. त्यांच्या या विधानावर आता मंत्री संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. संजय शिरसाट यांनी म्हटलं की, “राज्यातील सर्वच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निवडी अद्याप बाकी आहेत. पुढच्या एक ते दोन दिवसांत पालकमंत्री पदाची यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे कोणी काही चिंता करण्याचं कारण नाही. आता प्रश्न राहिला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होईल? तर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील. त्यामुळे आमच्याकडे पालकमंत्री पदावरून कोणतेही वाद नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो पालकमंत्री आमच्या जिल्ह्याला देतील तो आम्हाला मान्य असेल”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

पालकमंत्री पदाबाबत प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री पदाबाबत भाष्य केलं. प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं की, “आता महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. त्यामुळे आता पालकमंत्री पदाबाबत पुढच्या एक ते दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल”, असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकमंत्री पदाबाबत बावनकुळे काय म्हणाले होते?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री पदाच्या निवडीबाबत भाष्य केलं होतं. बावनकुळे यांनी म्हटलं होतं की, “पालकमंत्री नियुक्तीचा कोणताही पेच नाही. महायुतीचे सरकार असल्याने घटक पक्षांना विचारात घेऊन निर्णय घ्यावा लागतो. २६ जानेवारीपूर्वी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे नाव जाहीर होईल”, असं त्यांनी म्हटलं होतं.