Sanjay Raut : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, महायुतीला मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हा विजय ईव्हीएमचा असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. यावरून अनेकदा आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह, एकनाथ शिंदे यांना मोठा इशारा दिला आहे. ‘लक्षात घ्या, राजकारणात सर्वांचे दिवस बदलत असतात. कोणीही अमृत पिऊन आलेलं नाही’, असं म्हणत संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सूचक भाष्य केलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

“स्थानिक पातळीवर चांगले नेते आहेत. खंबीरपणे काम करणारे लोक आहेत. त्यामुळे शिवसेना (ठाकरे)अनेक संकटातून पुढे गेलेली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने एकमेकांचं काम केलं नाही असं मी कधीही बोललो नाही. भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या सहकारी पक्षाला मिळालेलं यश हे का मिळालं? यावर अनेकदा चर्चा झाली. आता सध्या आमदार उत्तम जानकर या क्षणी दिल्लीत आहेत. ईव्हीएमच्या विरोधात त्यांच्याकडे मोठे पुरावे आहेत. निवडणुकीत कशा प्रकारे बूथ ताब्यात घेण्यात आले याबाबतचे पुरावे घेऊन उत्तम जानकर दिल्लीत गेले आहेत. मात्र, त्यांना निवडणूक आयोगाचे आयुक्त भेटत नाहीत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं.

नाशिक महापालिका स्वबळावर लढवणार का?

“आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली आहे. मुंबईचं राजकारण वेगळं असतं. आता राज्यातील प्रत्येक महापालिकेचे प्रश्न वेगवेगळे असतात. नाशिक महापालिकेबाबत स्थानिक नेत्यांनी काही निर्णय घेतला तर त्याबाबत आम्ही योग्य निर्णय घेऊ. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीबाबत आम्हाला वाटलं की स्वबळावर निवडणूक लढवून नाशिकमध्ये आम्ही भाजपा आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या पक्षाचा आम्ही पराभव करू शकतो, तर आम्ही त्याबाबत विचार करू. मात्र, आम्ही अशा पद्धतीचा निर्णय अद्याप ठरवलेला नाही. आमचे नाशिकमधील स्थानिक नेते ठरवतील”, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

संजय राऊतांची शिंदेंवर टीका

एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यानिमित्त बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की, “कोणाचे आभार? ईव्हीएमचे आभार का? खरं तर त्यांनी चौकाचौकात ईव्हीएमच्या प्रतिकृती उभा करून आभार मानले पाहिजेत. एकनाथ शिंदे यांनी दोन गोष्टींचे आभार मानले पाहिजेत. निवडणुकीत वापरलेला काळा पैसा, प्रशासकीय यंत्रणा आणि ईव्हीएम. कारण विधानसभेची निवडणूक ही घोटाळे करून जिंकली आहे. तसेच एकनाथ शिंदे यांचा निकाल संशयास्पद आहे. तसेच भाजपाचाही निकाल संशयास्पद आहे”, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“निवडणूक आयोगाने हातमिळवणी करून आमचा पक्ष ताब्यात घेण्याचं काम त्यांनी केलं. एकनाथ शिंदेंनी पक्ष स्थापन केलेला आहे का? एकनाथ शिंदेंना पक्ष ताब्यात देण्याचं काम अमित शाह यांनी केलं. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या घरात बाळासाहेब ठाकरेंचा नाही तर अमित शाह यांचा फोटो हवा. आता जे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून फिरत आहेत त्यांनी त्यांच्या देवघरात अमित शाह यांचा फोटो लावला पाहिजे. कारण त्यांचं दैवत अमित शाह आहेत. पक्ष चोरण्याचं, आमच्या पक्षाचं चिन्ह चोरण्याचं आणि आमचा पक्ष शिंदेंना देण्याचं काम हे अमित शाहांनी केलेलं आहे. मात्र, लक्षात घ्या, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात. मग अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे अमृत पिऊन आलेले नाहीत”, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला.