देशात लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, त्याआधी १ जून रोजी एक्झिट पोलचा अंदाज समोर आला. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. भाजपाप्रणित एनडीएने ३५० चा आकडा पार केल्याचं एक्झिट पोलच्या आकडेवारीत दिसत आहे. या एक्झिट पोलसंदर्भात आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत आमचा एक्झिट पोलवर विश्वास नसून देशात इंडिया आघाडीच सरकार स्थापन होईल, असं म्हटलं आहे.

खासदार संजय राऊत काय म्हणाले?

“एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मतदान केलेलं नाही. त्यामुळे हे समोर आलेले एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत. राजस्थानमध्ये एकूण २६ जागा आहेत आणि तेथे एका कंपनीने भारतीय जनता पार्टीला ३३ जागा दाखवल्या. मला असं वाटलं एक्झिट पोल हे सर्व मिळून भाजपाला ८०० ते ९०० जागा देतील. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एवढं ध्यान केलं आहे. त्यांनी एवढ्या दिवस ध्यानधारणा केली, त्यामुळे ३६० किंवा ३७० म्हणजे काहीच नाही. ध्यानधारणा करणाऱ्या माणसाला ८०० जागा मिळायला पाहिजे”, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केली.

हेही वाचा : Maharashtra Exit Poll: चंद्रकांत पाटील म्हणतात, “मी सेफॉलॉजीनुसार गणित मांडल्यावर निष्कर्ष काढलाय की महाराष्ट्रात…”!

अमित शाहांवर आरोप

गेल्या काही वर्षात एक्झिट पोल चुकीचे ठरत आहेत. देशाचं गृहमंत्रालय यावर कशा पद्धतीने प्रभाव टाकत आहे हे सर्वांना माहिती आहे. अमित शाह यांनी १८० जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावलं आहे. आता त्यांनी कसं धमकावलं हे सांगण्याची गरज नाही. जर जिंकण्याची खात्री असेल तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही. किंवा अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येत नाहीत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“देशात इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होईल. २९५ ते ३१० जागा या इंडिया आघाडीच्या येतील. आम्ही हा लोकांमधून घेतलेला कौल आहे. महाराष्ट्रात काय होणार? देशात काय होणार? हे आम्हाला माहिती आहे. कोणीही कितीही आकडे सांगूद्या. मात्र, इंडिया आघाडी सरकार बनणार हे निश्चित आहे”, असंही राऊत म्हणाले.

महाविकास आघाडी किती जागा जिंकेल?

“महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३५ पेक्षा जास्त जागा जिंकेल. यातील काही जागांविषयी कौल आम्ही आता देत नाहीत. गेल्या काही दिवासांपासून ऐकत होतो की, बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव होईल, असं काहीजण म्हणत होते. मात्र, आम्ही खात्रीने सांगत होतो सुप्रिया सुळे या कमीत कमी दीड लाख मतांनी जिंकून येतील. राज्यात शिवसेना ठाकरे गटाचा १८ जागांचा आकडा कायम राहील. देशात काँग्रेस चांगल्या जागा घेईल.उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक ही राज्य देशात परिवर्तन घडवतील”, असंही संजय राऊतांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांगलीच्या जागेसंदर्भात नंतर बोलणार

सांगली लोकसभेच्या जागेसंदर्भात एक्झिट पोलमध्ये विशाल पाटील हे जिंकतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, “सांगलीच्या जागेसंदर्भात मी नंतर बोलणार आहे. आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. आमचं संपूर्ण आयुष्य राजकारण आणि समाजकारणात गेलं आहे”, असं संजय राऊतांनी म्हटलं.