Sanjay Raut on Mahayuti Govt ministers Removal: “मंत्रिमंडळामध्ये कुणाला ठेवायचं आणि कुणाला वगळायचं हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा असला तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शाहांच्या हाती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्लीत एका कार्यक्रमासाठी गेले होते. मंत्रिमंडळात सध्या गोंधळाचे वातावरण असून परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेली आहे, यावर मार्ग काढण्याचा त्यांचा मुख्य हेतू होता”, असा दावा शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केला.
‘हे’ चार मंत्री बाहेर जाणार – संजय राऊत
“मी काही दिवसांपासून सांगत आहे की, या मंत्रिमंडळातील चार मंत्री बाहेर जाणार आहेत. संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, संजय राठोड आणि आता योगेश कदम यांचे नाव त्यात जोडले गेले आहे. आणखीही काही नावे समोर येत आहेत. पण फक्त चार मंत्र्यांनाच नाही तर संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून नव्या चेहऱ्याचे मंत्रिमंडळ आणावे, अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे”, असाही दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, भ्रष्टाचार, शेतकरी विरोधी विधाने, लेडीज बार, घोटाळे, पैशांच्या उघड्या बॅगा घेऊन बसणे यावरून सरकारची प्रतिमा मलिन होत आहे. हे ओझे आता देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेपलीकडे गेले आहे. पण ते फेकताही येत नाही, अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. ज्यांच्याकडे १३७ चे संख्याबळ आहे, त्यांना अशा ओझ्यामुळे वाकण्याची गरज नाही. पण तरीही ते वाकत आहेत.
उपमुख्यमंत्री शिंदेंचा जवळचा माणूस भ्रष्टाचाराचा आरोपी
झारखंडमधील मद्य घोटाळ्यात महाराष्ट्रातून काल एक अटक झाली. सुमित फॅसिलिटीच्या अमित साळुंखेची अटक करण्यात आली. अमित साळुंखे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अत्यंत जवळचा माणूस आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. अमित साळुंखेच्या माध्यमातून राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला आहे, हे प्रकरणही आता ईडीच्या रडारवर येणार आहे, असे सांगत मंत्रिमंडळात वरपासून खालपर्यंत साफसफाईची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.
माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागेल
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सभागृहात मोबाइलवर पत्ते खेळल्यामुळे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र त्यांचे केवळ खाते बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता संजय राऊत म्हणाले की, कोकाटेंना राजीनामा द्यावाच लागेल किंवा त्यांना काढावा लागेल. शेतकऱ्यांचा अपमान केवळ खाते बदलून हा गुन्हा माफ होईल का? अजित पवारा यांना हे मान्य आहे का? स्वतःला शेतकरी समजणाऱ्यांना हे पटत आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.