Uddhav Thackeray on MLA Sanjay Gaikwad Slap: शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कँटिनमध्ये कर्मचाऱ्यांना निकृष्ट जेवणावरून मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आमदार गायकवाड कमरेला टॉवेल गुंडाळून बनियनवर मारहाण करत असल्यामुळे या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. तसेच विधिमंडळातही या घटनेचे पडसाद उमटले. शिवसेनेचे (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे आज विधिमंडळात आले असता त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरेंनी हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदनामीसाठी काढले गेले असावे, असा संशय व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदानात गिरणी कामगार आणि शिक्षकांच्या मोर्चाला उपस्थिती दर्शविल्यानंतर विधिमंडळात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारमध्ये काहीतरी चालले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचा प्रयत्न दिसत आहे. त्यामुळे त्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे मी ऐकले. कारवाई होते की नाही? हे काही दिवसांतच कळेल. अन्यथा याला मुख्यमंत्र्यांचे पाठबळ असेल, हे सिद्ध होईल.

मुख्यमंत्र्यांची बदनामी कशी होत आहे? याबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदावर दावा होता. त्यांना मुख्यमंत्री बनवले गेले नाही. त्यामुळे ते वाटच बघत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“विधिमंडळ हे शेतकरी, कामगार, शिक्षक यासारख्या घटकांना न्याय देण्यासाठी आहे. पण काही फालतू लोकांना महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी आणि आमचा कारभार स्वच्छ असल्याचे दाखवून द्यावे. मी म्हटले त्याप्रमाणे खरा भाजपा पक्षाचा खून झाला असून हे असे मारेकरी मोकाट फिरत आहेत”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.