हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी रविवारी झाली. मतमोजणीत शिव शेतकरी विकास गटाने १८ पैकी १७ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार व शिवसेना उद्धव ठाकरे हे चार पक्ष एकत्र आले होते. यामध्ये काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव, भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे यांच्या नेतृत्वाखालील गटाला भोपळाही फोडता आला नाही. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार राजीव नवघरे व शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांच्या गटात ही लढत झाली. या दोन्ही गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सोबतीला काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव, उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष टारफेंसह इतरही होते. खरे तर गजानन घुगे, आमदार प्रज्ञा सातव व बाजार समितीचे माजी सभापती संजय बोंढारे, आमदार संतोष बांगर यांच्या प्रतिष्ठेची म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते.
आखाडा बाळापूर येथील काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांचे पूर्वीपासूनच बाजार समितीवर वर्चस्व होते. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर ते शिवसेना शिंदे गटात सामील झाले. संजय बोंढारे जिकडे तिकडेच बाजार समितीची सत्ता हे समीकरण जुनेच आहे. संजय बोंढारे अनेक वर्ष बाजार समितीचे सभापती होते. त्यानंतर त्यांचे चिरंजीव दत्ता बोंढारे हे सुद्धा सभापती होते. परत सभापती पदावर त्यांचाच दावा राहणार असल्याचे मानले जाते.
मतमोजणीअखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या विजयी उमेदवारांमध्ये माजी सभापती दत्ता बोंढारे, दत्ता माने, रावसाहेब अडकिणे, बाजीराव सवंडकर, सुधाकर मुलगीर, ओम प्रकाश कदम, मारोती सूर्यवंशी, नंदाबाई पतंगे, जयश्री शिंदे, विजय गंगेवार, नीळकंठ नरोटे, गजानन देशमुख, अमोल चव्हाण, दत्तराव सावळे, संजय भुरके, सुनील अमिलकंठवार, मारोती हेंद्रे (सर्व शिंदेसेना -राष्ट्रवादी) तर शिवचरण गोयंका (अपक्ष) यांचा समावेश आहे.