जालना : शिवसेनेत जवळपास चार दशके राहिल्यानंतर माजी आमदार शिवाजीराव चोथे मंगळवारी (दिनांक १६ सप्टेंबर) अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात त्यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.
चोथे हे जालना जिल्हयातील शिवसेनेने १९९० पूर्वीपासूनचे पुढारी आहेत. जवळपास चार दशकांपूर्वी त्यांचा आणि शिवसेनेचा संबंध आला. अंबड तालुक्यातील शहागड हे त्यांचे मूळ गाव. छत्रपती संभाजीनगर आणि बीड रस्त्यावरील शहागड येथील बसस्थानक पूर्वीपासून त्या परिसरात महत्वाचे आहे.
या बसस्थानकावर त्या काळात वर्तमानपत्रे मिळत असत. त्यामध्ये ‘मार्मिक’ साप्ताहिकही असायचे .’मार्मिक’ मध्ये शिवसेनेच्या संदर्भात येणारा मजकूर वाचून ते शिवसेनेकडे आकृष्ट झाले. चोथे शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख. या पदावर ते जवळपास सत्तावीस वर्षे राहिले. प्रारंभीच्या काळात शिवसेनेचे संघटनात्मक पातळीवरीत सुरू केलेले काम त्यांनी पुढेही सुरु ठेवले.
अर्जुनराव खोतकर, भास्करराव अंबेकर, दिवंगत आमदार नारायणराव चव्हाण यांच्यासारखे साथीदार त्यांना शिवसेनेत प्रारंभी मिळाले. अशा अनेक सहकाऱ्यांसह पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांनी जिल्हाभर काम केले. १९९० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जालना जिल्हयात शिवसेनेला मोठे यश मिळाले. कारण या निवडणुकीत शिवसेनेकडून अर्जुनराव खोतकर आणि नारायणराव चव्हाण (बदनापूर) हे दोन आमदार निवडून आले होते. पाचपैकी दोन आमदार निवडून आल्याने शिवसेनेचे जिल्ह्यातील राजकीय बळ या काळात वाढले होते. १९८५ मध्ये तर जिल्हयातील पाचपैकी तीन आमदार शिवसेनेचे निवडून आले. यामध्ये शिवाजीराव चोथे यांचाही समावेश होता.
१९९५ मध्ये त्यावेळच्या अंबड विधानसभा मतदार संघात चोथे यांची लढत झाली होती ती त्यावेळचे काँग्रेसमधील मातब्बर पुढारी विलासराव खरात यांच्याशी. खरात दहा वर्षांपासून आमदार होते आणि त्यांच्या सोबतच्या लढतीत चोथे यांचा निभाव लागणार नाही असा अंदाज त्यावेळी राजकीय वर्तुळातून व्यक्त केला जात होता. परंतु प्रत्यक्षात मात्र खरात यांचा ४ हजार ६४८ मतांनी पराभव करून चोथे विजयी झाले होते. त्यानंतर १९९९ आणि २००४ मध्येही चोथे यांनी अंबड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून निवडणूक लढविली.
परंतु या दोन्हीही निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश टोपे यांच्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही. २०२४ ची निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढविली परंतु त्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. चोथे यांनी जवळपास चाळीस वर्षांनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांचा मुलगा विनायक हाही आता राजकीय क्षेत्रात असून युवासेनेचा (उध्दव अकरे) मराठवाडा पातळीवरील पदाधिकारी आहे.
विनायक चोथेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. शिवाजीराव चोये यांचे कार्यक्षेत्र असलेल्या घनसावंगी विधानसभा मतदार संघातून डॉ. हिकमत उढाण (शिवसेना, शिंदे) निवडून आलेले आहेत. त्यांचे आणि चोथे यांचे गेल्या कोही वर्षांत राजकीय सख्य राहिलेले नाही. काँग्रेस पक्षाचा अंबड आणि घनसावंगी भागात प्रभाव नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत राजेश पवार टोपे यांच्या सारखे नेतृत्व कार्यरत आहे असून हा पक्ष राज्यातील सत्तेपासून दूर आहे. शिवसेनेत फाटाफूट झाल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आकर्षण काहीसे कमी झाल्याचे जाणवत आहे.
