वाई : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या जोडीनेच शरद पवारांना वापरल्या जाणाऱ्या ‘जाणता राजा’ या उपाधीच्या वादाला आज निराळे वळण मिळाले. खुद्द पवारांनी या वादात ही पदवी छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदासांनी दिलेली असल्याने शिवाजी महाराजांना ‘जाणता राजा’ असे म्हणण्याची गरज नाही, असे जाहीर केले. छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माने, कर्तृत्वाने लोकांच्या अंत:करणांत ‘छत्रपती’च राहतील, असे मत पवार यांनी साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून गेले काही दिवस राज्यात गदारोळ सुरू होता. हा वाद सुरू असतानाच पवार यांना गेली अनेक वर्षे छत्रपती शिवाजी महाराज यांना वापरली जाणारी ‘जाणता राजा’ ही उपाधी लावण्यावरूनही वाद सुरू झाला आहे. या वादात मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी उडी घेत  ‘जाणता राजा’ हे संबोधन अन्य कोणी वापरणे हा देखील महाराजांचा अपमान असल्याची टीका पवारांवर केली होती. या पार्श्वभूमीवर पवार यांनी आज साताऱ्यातच एका कार्यक्रमात या पदवीबद्दल वरील मतप्रदर्शन केले.

मला कार्यकर्ते ‘जाणता राजा’ म्हणतात. पण मी कोणालाही तसे म्हणायला सांगितले नव्हते. खरे तर ही उपाधी समर्थ रामदासांनी महाराजांना दिलेली आहे. परंतु त्यांची खरी उपाधी ही ‘छत्रपती’ हीच आहे. समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू  नव्हते. त्यामुळे महाराजांना ‘जाणता राजा’ म्हणण्याची गरज नाही. शिवाजी महाराज जन्माने, कर्तृत्वाने लोकांच्या अंत:करणात ‘छत्रपती’च राहतील.

शरद पवार</strong>