शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे शिरुर लोकसभा मतदारसंघात राजकारण सध्या जातीच्या वळणावर येऊन ठेपलं आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे अभिनेते अमोल कोल्हे यांच्यावर टीका करत त्यांची जात काढली. अमोल कोल्हे यांची जात मराठा नाही तर माळी असल्याचं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं आहे. त्यांच्या या विधानामुळे मतदारसंघात चांगलीच खळबळ माजली.
‘काही पत्रकरांनी मला विचारलं की, शिरुर मतदारसंघात मराठा समाजाचा तगडा उमेदवार देणार अशी राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती आहे. मी त्यांना विचारलं असा कोण आहे मराठा समाजाच उमेदवार…यावर पत्रकारांनी अमोल कोल्हे यांचं नाव सांगितलं. मी त्यावर एवढंच म्हणालो की अमोल कोल्हे माळी समाजाचे आहेत मराठा नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे’, असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.
वाद निर्माण होत असलेला पाहून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सारवासारवही केली आहे. ‘राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी मी जातीचं राजकारण करत असल्याची उलट सुलट चर्चा सुरु केली आहे. शिवसेनेत कधीही जातीचं राजकारण नसतं, मला बाळासाहेबांची शिकवण आहे. मी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी कोणाच्याही जातीचा उल्लेख करत नाही. माझ्यासाठी सगळ्या जाती समान आहेत. सगळ्यांबद्द्ल आदर आहे. मी कधी जातीचं राजकारण केलं नाही. राष्ट्रवादीने माझ्याविरोधातील खोटा प्रचार थांबवावा’, असं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.
अमोल कोल्हे यांनीही या टीकेला उत्तर दिलं आहे. माझी जात विचारू नका मी छत्रपतींचा मावळा आहे असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. माझी जात म्हणजे मी छत्रपतींचा मावळा हीच आहे असंही अमोल कोल्हे यांनी सांगितलं आहे. अमोल कोल्हे जुन्नरच्या दौऱ्यावर आहेत त्यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी स्वतःचा उल्लेख छत्रपतींचा मावळा आहे असा केला आहे.
