विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले असल्याने शिंदे गटातील १६ आमदारांना दिलासा मिळाला आहे. शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीशांकडे दाखल याचिकांवर सुनावणीसाठी विनंती केली असता हे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान सुप्रीम कोर्टाने घटनापीठीकडे प्रकरण सोपवावं लागेल सांगताना त्यासाठी अवधी लागणार असल्याचंही म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाकडून हे अपेक्षित नाही सांगत त्यांनी नाराजी जाहीर केली आहे.

अरविंद सावंत म्हणाले की, “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं आहे त्याच्या मुळावर घाव घालण्याचं जे काम सुरु आहे त्याची जास्त चिंता वाटत आहे. उद्धव ठाकरेंनीही तीच चिंता व्यक्त केली आहे”.

“शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांवर तूर्त कारवाई नको,” सर्वोच्च न्यायालयाच्या विधानसभा अध्यक्षांना सूचना

“कायद्याची पायमल्ली होत असताना सुप्रीम कोर्ट आणि सगळेच शांत आहेत. अध्यक्षांनी निर्णय घेऊ नये सांगत सुप्रीम कोर्टाने नक्की कोणाला दिलासा दिला आहे?,” अशी विचारणा अरविंद सावंत यांनी केली आहे.

“अध्यक्षांनी आमच्या बाजूने निर्णय दिला असता का हा वेगळा प्रश्न आहे. पण सरकार तसंच राहणार का? बेकायदेशीरपणे निर्माण झालेल्या सरकारला ज्या प्रकारे संरक्षण दिलं जात आहे आणि वेळकाढूपणा केला जात आहे, न्याय देण्यास उशीर करणं हे सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित नाही. आम्ही सुप्रीम कोर्टाकडे एकमेव आशा म्हणून पाहत आहोत. आमच्याकडे शिवसेना म्हणून पाहू नका, पण देशाच्या संविधानाच्या पायावर घाव घातला जात आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये असंच घडलं होतं,” असं अरविंद सावंत यांनी सांगितलं.

Maharashtra Political Crisis Live : शिवसेनेने केसेस मागे घ्याव्यात, जनादेशाचा आदर करावा- बावनकुळे

“गोव्यात काय सुरु आहे हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. हे सत्तापिसासू लोक आहेत. देशात सध्या इतके प्रश्न आहेत. गॅसचा भाव वाढलेला असतानाही आम्ही शांत आहोत. घटनेला पायदळी तुडवलं जात आहे याचं दु:ख आहे,” असं अरविंद सावंत यांनी सांगितलं.

“मुख्यमंत्र्यांनी आमच्या संपर्कात असलेल्यांची नावं पाठवून देतो असं सांगितलं होतं. त्यांनी त्या १४ जणांची नावं द्यावीत,” असं आव्हान अरविंद सावंत यांनी यावेळी दिलं. पक्षप्रमुखांनी आम्हाला कधीच मत मांडण्यापासून रोखलेलं नाही असंही सांगत अरविंद सावंत यांनी आरोप फेटाळले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

सुप्रीम कोर्टात आज आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तसंच इतर याचिकांवर सुनावणी होणार होती. मात्र, आज ही प्रकरणे खंडपीठासमोर सुनावणीस न आल्याने शिवसेनेच्या वतीने सरन्यायाधीशांकडे या सुनावणीबाबत विनंती करण्यात आली. यावेळी अध्यक्षांकडून उद्या अपात्रतेवर सुनावणी होणार असल्याची माहिती कपिल सिब्बल यांनी यावेळी दिली. कोर्टात सुनावणी झाली नाही तर अध्यक्ष याचिका फेटाळून लावतील अशी शक्यता कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली. यानतंर सुप्रीम कोर्टाने सुनावणी होईपर्यंत अध्यक्षांनी कोणतीही कारवाई करु नये असे आदेश दिले.