scorecardresearch

“त्यांनी शिवसेना नुसती फोडली नाही, तर…”, उद्धव ठाकरेंचं बंडखोरांवर टीकास्त्र!

उद्धव ठाकरे म्हणतात, “आजपर्यंत जे काही देता येणं शक्य होतं, ते ज्यांना द्यायचं ते दिलं. पण त्यांनी ते घेऊन त्यांचे गुण दाखवून दिले. आत्ता तरी…!”

Uddhav Thackeray Shivsena Twitter
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (संग्रहीत छायाचित्र)

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील ४० आमदारांच्या गटानं बंडखोरी करत भाजपासोबत हातमिळवणी केली आणि राज्यात सत्तापालट झाला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेत उभी फूट पाहायला मिळत असून बंडखोरांना समर्थन देणाऱ्या गटाच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसैनिक असा वाद दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना भवनात कार्यकर्त्यांशी बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर गटावर टीकास्त्र सोडलं. तसेच, आपण जोशात भान देखील ठेवायला हवं, असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

“आजपर्यंत जे देता येणं शक्य होतं..”

यावेळी आत्तातरी माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं काहीही नाही, असं उद्धव ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांना म्हणाले. “तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आजपर्यंत जे काही देता येणं शक्य होतं, ते ज्यांना द्यायचं ते दिलं. पण त्यांनी ते घेऊन त्यांचे गुण दाखवून दिले. आत्ता तरी माझ्या हातात तुम्हाला देण्यासारखं काही नाहीये. मला हेच सांगायचंय की तुमच्या सगळ्यांच्या ताकदीने आपण ज्यांना दिलं, ते गेले. पण त्यांना ते देणारे सगळे माझ्यासोबत राहिले आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“महाराष्ट्रात फक्त बाळासाहेबांचीच शिवसेना असेल”

“जोश हा पाहिजेच. कारण पराभव पदरी पडला, तर त्याचं विजयात रुपांतर करायला मन खंबीर पाहिजे. पण त्यासोबत भानसुद्धा पाहिजे. यापुढे धनुष्यबाणच असेल. पण तो जिंकवायचा कसा, यासाठी तयारीला लागा. त्यांनी शिवसेना नुसती फोडली नाही, तर त्यांना शिवसेना संपवायची आहे. पण महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. दुसरी शिवसेना या राज्यात येऊ शकत नाही. कायद्याने ते शक्य नाही”, असा ठाम निर्धार उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलून दाखवला.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा मोठा निर्णय, भावना गवळींची लोकसभा प्रतोदपदावरून उचलबांगडी!

“कुठेही यांच्या भ्रमाला बळी पडू नका. पुढचे थोडे दिवस लालूच दाखवण्याचे आणि दमदाटी करण्याचे असू शकतील. तिथे कुणी विकला जाता कामा नये आणि शरण जाता कामा नये”, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena chief uddhav thackeray slams rebel mla eknath shinde pmw

ताज्या बातम्या