शिवसेनेचा दसरा मेळावा रविवारी करोनामुळे साधेपणानं पार पडला. मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित झालेल्या या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप व केंद्रातील मोदी सरकारला चिमटे काढत हिंदुत्वावरून टोले लगावले. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून वेगळ्या झालेल्या नितीश कुमारांवरून भाजपाला सवाल करत बिहारच्या मतदारांना आवाहन केलं.
रविवारी झालेल्या महाविजयादशमीनिमित्तच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “देश ही कोणा एका पक्षाची मक्तेदारी नाही. आपल्या साम्राज्यावरील सूर्य कधी मावळत नाही अशी इंग्रजांनाही मस्ती होती. पण इंग्रजांचे साम्राज्य मावळले, सूर्य तळपतच आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आपलेच सरकार अशी महत्त्वाकांक्षा भाजपाची होती. ती संधी भाजपाने आपल्या वृत्तीमुळे गमावली. शिवसेनेसह महाराष्ट्रात, विष्णोई यांच्यासह हरयाणात व आता नितीशकुमार यांच्यासह बिहारमध्ये हाच पाठीत वार करण्याचा डाव खेळत आहेत. दहीहंडी फोडताना पाया मजबूत हवा नाही तर पाया ढासळतो आणि वरचा माणूस दोरीला लटकतो. आधी शिवसेना, मग अकाली व आता इतर काही जण रालोआ व भाजपामधून बाहेर पडत आहेत. पाया ढासळत आहे. देश संकटात असताना पाडापाडीचे उद्योग सुरू राहिले तर देशात अराजकाला आमंत्रण मिळेल. त्यातून मग कोणीही चालेल पण तुम्ही नको, असे म्हणून केंद्रातील भाजपाचे सरकार लोक पाडतील. त्यामुळे आधी तुमचे केंद्रातील सरकार सांभाळा,” असे ठाकरे यांनी सुनावले. “बिहारमधील मतदारांनी छक्केपंजे करणाऱ्यांना मतदान करू नये”, असे आवाहनही त्यांनी केलं.
आणखी वाचा- घरी खायला मिळत नाही म्हणून…;आदित्य ठाकरेंवरील आरोपांवरून उद्धव ठाकरेंनी कंगनाला सुनावलं
आणखी वाचा- एक बेडूक… भाडोत्री बाप ते रावणी औलाद; उद्धव ठाकरेंनी डागली तोफ
उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून राज्यपालांनाही नाव न उच्चारता टोला लगावला. ” मोहन भागवतांना राष्ट्रपती करा म्हणणारी शिवसेना यांना चालत नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधी सेक्युलर चेहऱ्याचा मुद्दा काढत भाजपापासून वेगळे झालेले नितीशकु मार यांना चालले. नितीशकुमारांनी यांना सेक्युलर लस दिली की यांनी त्यांना हिंदुत्वाची लस दिली हे पत्र खरडणारे सांगतील का?,” असा बोचरा सवाल ठाकरे यांनी कोश्यारी यांना उद्देशून केला.