बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना खुलं आव्हान देणाऱ्या शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी आता पुन्हा एकदा मनसेवर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. अयोध्येतील दौऱ्यावरून राज ठाकरेंना आव्हान देताना दिपाली सय्यद यांनी “सभा घ्यायच्याच असतील, तर अयोध्येमध्ये घेऊन दाखवा. पुण्यामध्ये तर सिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात, तेही जास्त गर्दी करून”, असं ट्वीट केलं होतं. यानंतर त्यांनी मनसेवर खोचक टीका करणारा व्हिडीओ संदेश जारी केला आहे.

राज ठाकरेंच्या पुणे सभेवरून टोला!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच पुण्यात सभा घेणार असल्याचं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्याचसंदर्भात राज ठाकरे पुणे दौऱ्यावर देखील आले होते. मात्र, अचानक ऐनवेळी त्यांची सभा पुढे ढकलण्यात आल्यामुळे त्यावरून तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत. याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता, राज ठाकरेंची सभा पुढील आठवड्याभरात होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज ठाकरे स्वत: सभेचं ठिकाण आणि वेळ जाहीर करणार आहेत. सभेसाठी काही ठिकाणांना पोलिसांनी परवानगी दिल्याचंही मनसे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

मात्र, या घडामोडींनंतर दिपाली सय्यद यांनी जारी केलेल्या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना दिलेल्या मुन्नाभाई या उपमेचा उल्लेख करत निशाणा साधला आहे. “पावसाचं कारण सांगून मैदान सोडले..भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले..आयोध्येचे कंत्राट अर्धेच मिळाले.. महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले”, असं दिपाली सय्यद या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत.

राज ठाकरेंची पुण्यातील सभा पुढे ढकलली, तर्क-वितर्क सुरू होताच मनसे पदाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सभा पुढे का ढकलली?

राज ठाकरेंची सभा पुढे ढकलण्यामागचं कारण स्पष्ट करताना मनसे नेते बाबू वागसकर यांनी सांगितलं की, राज ठाकरे यांच्या सभेसाठी डेक्कन येथील नदी पात्रातील जागा मिळावी, याबाबत पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र हवामान विभागाने २३ तारखे पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच नदीपात्रात मेट्रोचं काम देखील सुरू आहे. अशात जोरदार पाऊस आला तर सभेच्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांना मोठा त्रास होऊ शकतो.त्यामुळे आम्ही नदी पात्रातील ठिकाण रद्द केलं असून आम्हाला अन्य तीन ठिकाणांची परवानगी मिळाली आहे. त्या ठिकाणाबाबत राज ठाकरे उद्या स्वतः जाहीर करतील. या आठवड्याच्या शेवटी ही सभा होणारच आहे. कोणत्याही परिस्थितीत सभा रद्द होणार नाही” असंही वागसकर म्हणाले.