शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. या राजकीय गदारोळानंतर राज्यामध्ये सुरु असणाऱ्या राजकीय संघर्षासंदर्भात भाष्य करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याला पदाची लालसा नसल्याचं म्हटलं. ‘मी अयोग्य आहे, हे बंडखोर आमदारांनी समोर येऊन सांगावं, मी लगेचच राजीनामा देईन’, असेही उद्धव ठाकरे भाषणादरम्यान म्हणाले. यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत असताना नुकतंच शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनीही ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे.

“सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे साहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी, भविष्यात जे होईल त्याचा स्वीकार करू”, असे दिपाली सय्यद यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : आमच्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त संख्याबळ, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं : एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फळी निर्माण झाली आहे. जवळजवळ ४३ आमदारांनी बंडखोरी करत शिंदेंना समर्थन दिल्यामुळे शिवसेना खिळखिळी झाली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत राजीनामा देण्यास तयार आहे, असे सांगितले. यावेळी ते म्हणाले, “कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते मला पाठिंबा देत आहेत. पण, माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको असेन तर त्यांनी समोर येऊन सांगावे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची माझी तयारी आहे. मी पद सोडल्यानंतर शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार असेल तर आनंदच आहे. मी शिवसेना पक्षप्रमुखपदही सांभाळायला अपात्र आहे, असे शिवसैनिकांना वाटत असेल तर तेही सोडेन.”

हेही वाचा : रिक्षा चालक ते नगरविकास मंत्री, उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदेचा राजकीय प्रवास 

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

त्यावर एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली होती. “महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या तत्वांशी तडजोड करावी लागत होती आणि ती आम्हाला मान्य नाही. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे आहोत”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यापुढे आम्ही अद्याप शिवसेना सोडण्याचा किंवा दुसऱ्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. फक्त आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची विचारधारा आम्ही पुढे घेऊन जात आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड सत्तेसाठी आम्ही करणार नाही,” अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली होती.