शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कथितप्रकारे बंड केलं आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर ते आपल्यासोबत जवळपास ३५ आमदारांना घेऊन गुजरातमध्ये गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शिवसेनेकडून केले जात आहेत. मात्र एकनाथ शिंदे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठं भगदाड पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

असं असताना मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी एकनाथ शिंदे यांना भावनिक साद घातली आहे. शिंदेसाहेब पुन्हा आपल्या घरी या, असं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. शिवसेनेत सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींमुळे किशोरी पेडणेकर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, “प्रत्येक दहा वर्षांनी शिवसैनिकांना अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्या वेदना आम्हाला आत्मक्लेश देतात. कालपासून ज्या पद्धतीने नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्याही आम्हाला आत्मक्लेश देणाऱ्या आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी एकनाथ शिंदे यांना काय आवाहन कराल, असं विचारलं असता किशोरी पेडणेकर यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की, “शिंदे साहेबांना काही सांगण्याएवढी मी मोठी नाहीये. पण एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विनंती करेन, ज्या पद्धतीने महाराष्ट्रात भाजपाकडून गाजरं दाखवण्याचा कार्यक्रम सुरू आहे, त्याला कृपया बळी पडू नका. आपल्या घरी परत या,” अशी भावनिक साद किशोरी पेडणेकर यांनी घातली आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, हिंदुत्व कोणीच सोडलं नाही. शिवसेना कधीच हिंदुत्व सोडू शकत नाही. शिवसेनेचं हिंदुत्व हे दाखवून आणि मिरवून घेणारं नाही. सेनेचं हिंदुत्व हे मानणारं आहे. याचा अर्थ दुसऱ्याच्या धर्माला कमी लेखावं, असा नाही. बाळासाहेबांनी असं कधीही केलेलं नाही,” असंही त्या म्हणाल्या.