गुढी पाडव्याचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना राज्यात त्यावरून राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. येत्या १० मार्च ८ एप्रिलपर्यंत राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यावरून भाजपाकडून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधण्यात येत असताना आता त्याला शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवाय त्यांनी आशिष शेलार यांना इशारा देखील दिला आहे.
आशिष शेलार यांनी गुढी पाडव्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “ठाकरे सरकारने गुढीपाडव्याची शोभायात्रा आणि राम नवमीच्या मिरवणुकांना परवानगी देण्याची स्पष्ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. ज्या ज्या वेळी हिंदू सणांचा विषय येतो त्यावेळी ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?” असा खोचक सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. त्यावरून आता मनीषा कायंदे यांनी आशिष शेलार यांच्यावर पलटवार केला आहे.
“त्यांच्या मेंदूला लकवा आलाय का?”
“आशिष शेलार यांना प्रदेशाध्यक्ष होण्याची घाई लागली आहे. त्यांना मुख्यमंत्रीपदाचीही स्वप्न पडत आहेत. ते ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांबद्दल बोलतायत, लकवा वगैरे शब्द वापरतायत. मला वाटतंय यांच्या मेदूला लकवा आलाय की काय”, असं मनीषा कायंदे म्हणाल्या आहेत.
हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?, भाजपाचा सवाल
“मी आशिष शेलार यांना इशारा देते…”
“आशिष शेलारांना मी इशारा देते. मुख्यमंत्र्यांबद्दल जे काही बोललं जातंय, ते शिवसैनिक खपवून घेणार नाहीत. मुख्यमंत्र्यांना जनतेच्या तब्येतीची काळजी आहे. जे निर्देश केंद्र सरकारकडून करोनाबाबतचे निर्देश येतात, त्याचं पालन आम्ही तंतोतंत करत आहोत. जे टास्क फोर्स सांगतो, ते करायला हवं. तुम्ही काही डॉक्टर नाही आहात, वैज्ञानिकही नाही आहात. त्यामुळे उगीच काहीतरी बोलून सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा तुमचा प्रयत्न बंद करा”, असं मनीषा कायंदे म्हणाल्या आहेत.
“…तेव्हा का नाही केलं?”
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या काळातच मशिदींवरच्या लाऊडस्पीकरवर बंदी का नाही आणली? असा सवाल देखील कायंदे यांनी केला आहे. “२०१४पासून १९ पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री होते. लाऊडस्पीकर आणि अजानबद्दल ते बोलत आहेत. मग तेव्हा त्यांनी ते का नाही केलं? विविध कोर्टाचे लाऊडस्पीकरबाबत निर्णय आहेत. त्यामुळे जिथे तुमचं राज्य आहे, तिथे तुम्ही लाऊडस्पीकर उतरवून दाखवा ना. मुद्दाम हिंदू-मुसलमान काहीतरी घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न मला दिसतोय. मुद्दाम दोन समाजांमध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न आहे. हे सगळं करून शिवसेना कशी हिंदुत्वापासून दूर गेली आहे, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे”, असं मनीषा कायंदे म्हणाल्या आहेत.