Rajan Teli Joins Eknath Shinde Shivsena: कधीकाळी कट्टर शिवसैनिक असणारे कोकणातील नेते राजन तेली भाजपा, ठाकरे गट असा प्रवास करत शिंदे गटात दाखल झाले आहेत. राजन तेलींच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कधीकाळी नारायण राणे, नितेश राणे व दीपक केसरकर यांच्याशी उभा तंटा मांडणारे राजन तेली आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्ताधारी पक्षात डेरेदाखल झाले आहेत. त्यामुळे कोकणातील राजकीय समीकरणं आगामी काळात बदलण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजन तेलींनी दिलेल्या सूचक प्रतिक्रियेमध्ये या राजकीय समीकरणांची बीजं असल्याचं म्हटलं जात आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने मुंबईत एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शिवाजी पार्क येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता तर दुसरीकडे नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडला. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर परखड शब्दांत टीकास्र सोडण्यात आले. पण या आरोप-प्रत्यारोपांमध्ये कोकणसाठी महत्त्वाची अशी बाब ठरली ती म्हणजे कोकणातील शिवसेनेचे बडे नेते राजन तेली शिंदे गटात दाखल झाले. गेल्या अनेक दिवसांपासून राजन तेलींच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यात ते भाजपात जाणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात होती. अखेर त्यांनी कोकणातील राजकारणासाठी शिंदेंच्या शिवसेनेचा पर्याय निवडला.
राजन तेलींनी ठाकरेंना सोडण्याचं काय कारण दिलं?
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केल्यानंतर राजन तेलींनी टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात काम करण्याची संधी मिळत नव्हती, असा दावा राजन तेलींनी केला आहे. शिवाय, संघटना बांधणीची मागणीही दुर्लक्षित ठेवल्याचा आरोप राजन तेलींनी केला आहे.
“संघटना बांधायला तिथे संधी नव्हती. आम्ही बऱ्याचदा प्रयत्न केला. एक जिल्हाप्रमुख नेमून सगळ्यांना बरोबर घेऊन बूथ स्तरावरची बांधणी करायला हवी असं आम्ही सांगितलं. पण दुर्दैवाने तिथे ते होत नव्हतं. मग संधीच नसेल तर आपल्याबरोबरच्या कार्यकर्त्यांना कधीच संधी मिळणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला”, असं राजन तेली म्हणाले.
“कुणावरच नाराज नाही, तेही चांगले!”
दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही राजन तेलींनी ठाकरेंबद्दल तीव्र टीका करणं टाळल्याचं यावेळी दिसून आलं. “मी कुठलं पद मागितलंच नव्हतं. पण खालच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करायला हवं. मी कुठल्याच पक्षावर नाराज नाही. ती सगळी मंडळीही चांगली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नाराज असण्याचा प्रश्नच नाही. मुद्दा एवढाच आहे की काम करण्याची संधी मिळायला हवी आणि लोकांची कामं व्हायला हवीत”, असं ते म्हणाले.
आता मरेपर्यंत शिवसेना – राजन तेली
आता पुन्हा कुठला पक्ष बदलणार नसल्याचं राजन तेलींनी यावेळी सांगितलं. “शिवसेनेचा झेंडा हातात घेतलाय. आता हा झेंडा कायमस्वरूपी मरेपर्यंत हातात राहील. मी सुरुवातीपासूनच शिवसैनिक आहे. त्यामुळे नक्कीच इथे चांगलं काम करण्याची संधी मला मिळेल. माझे जुने सहकारी निलेश राणे, उदय सामंत, दीपक केसरकर या सगळ्यांबरोबर चांगलं काम करता येईल”, असं म्हणत त्यांनी कधीकाळी वाद असणाऱ्या विरोधकांशी मनोमीलन झाल्याचे सूतोवाच केले.
कोकणातील नोकरी व उद्योगाच्या समस्येवर काम करणार
“मी कोणत्याही अपेक्षेने इथे आलेलो नाही. मला काहीतरी मिळेल असा माझा हेतू नाही. मला काम करण्याची आवड आहे. या माध्यमातून जनतेची कामं व्हावीत हाच यामागचा उद्देश आहे. कारण उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं आहे. त्यामुळे चांगलं काम करता येईल. कोकणातला मोठा विषय नोकरी-धंद्याचा आहे. इथे आरोग्य खातंदेखील आहे. या दोन्ही खात्यांमधून आपल्याला चांगलं काम करता येईल”, असं ते म्हणाले.
तेलींचा राणेंना कधी खमका पाठिंबा, तर कधी कट्टर विरोध!
राजन तेली पूर्वीच्या अखंड शिवसेनेत होते. त्यानंतर नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा ते त्यांच्यासोबत बाहेर पडले. नंतर राणेंबरोबरच ते आधी काँग्रेस आणि नंतर भाजपामध्येही होते. पण गेल्याच वर्षी त्यांनी नारायण राणेंवर परखड शब्दांत टीका करत भाजपाची साथ सोडून उद्धव ठाकरेंचा हात धरला होता. यावेळी नारायण राणेंसोबत शिवसेना सोडून आपण चूक केल्याचंही ते म्हणाले होते. शिवाय, भाजपा सोडताना राजन तेलींनी नितेश राणेंवरही परखड शब्दांत टीका केली होती. विशेषत: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीवेळी नितेश राणे विरुद्ध राजन तेली असा थेट वाद पाहायला मिळाला होता.