पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरून भाजपावर टीकेची झोड उठवली जात आहे. सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना सवाल केला आहे. “शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली, हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?,” असा प्रश्न राऊत उपस्थित यांनी केला आहे.
जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन करण्यात आले. दिल्ली भाजपाच्या कार्यालयात पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या पुस्तकाचे वृत्त सोशल माध्यमातून पसरल्यानंतर भाजपावर सगळीकडून टीका केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, या पुस्तकाच्या वादावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना सवाल केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत –
“आज के शिवाजी नरेंद्र मोदी, असं महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे महाशय कोण आहेत? हेच ते जय भगवान गोयल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!”
आज के शिवाजी नरेंद्र मोदी..
असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय कोण आहेत?हेच ते जयभगवान गोल.यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांचया महाराष्ट्राला व मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!! pic.twitter.com/LxWySzDX7s
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
“जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का? सातारा गादीचे वारसदार श्रीमंत उदयनराजे, श्रीमंत शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला… काहीतरी बोला…,”
सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयन राजे श्रीमंत शिवेंद्रराजे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे यांना हे मान्य आहे का?
शिवरायांचया वंशजांनो बोला..
काहीतरी बोला.. pic.twitter.com/FVZEOIkn8v
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2020
“निदान महाराष्ट्र भाजपानं तरी यावर भूमिका स्पष्ट करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही. एक सूर्य आणि एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज… छत्रपती शिवाजी महाराज…,”