एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली असल्याने सध्या राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे. जलील यांच्या प्रस्ताव महाविकास आघाडीने अमान्य केला असला तरी मात्र ते आग्रही आहेत. जलील यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचीही भेट घेणार आहेत. मात्र या भेटीआधीच उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी हा एमआयएमचा कट असल्याचं सांगत तो उधळून लावण्याचं आवाहन केलं.

उद्धव ठाकरेंनी बैठकीदरम्यान सांगितलं की, “शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून एमआयएमचा कट उधळून लावा”. तसंच यावेळी त्यांनी मेहबुबा मुफ्तींसोबत भाजपाने केलेल्या युतीची आठवण करुन देत म्हटलं की, “मेहबुबा मुफ्ती विसरु नका. एक वेळ अशी होती की, ते मुफ्तीसोबत संसार करत होते, आता ते आपल्याला बोलत आहेत”.

“मी आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतो, मग मी हिंदुत्त्वाच्या गप्पा मारतो”; AIMIMच्या ऑफरवरुन फडणवीसांवर शिवसेनेची टीका

आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत, महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे असंही स्पष्ट सांगितलं. यावेळी त्यांनी जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार राहा असं आवाहन केलं.

संजय राऊतांची प्रतिक्रिया

या बैठकीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “भाजपाने एमआयएमला शिवसेनेची बदनामी करण्याची सुपारी दिली आहे,” असा आरोप संजय राऊत यांनी केला. तसंच काही झालं तरी एमआयएमसोबत युती होणार नाही हे स्पष्ट केलं. शिवसेना कधीही हिंदुत्व सोडणार नाही असं संजय राऊतांनी यावेळी खडसावून सांगितलं. हा भाजपाच्या व्यापक कटाचा भाग असल्याचंही ते म्हणाले.

२२ ते २५ मार्च शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान

राज्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसंच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी शिवसेनेनं “शिवसंपर्क अभियान” सुरू केलं आहे. या अभियानाचा पहिला टप्पा २२ ते २५ मार्च दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकुण १९ जिल्ह्यात सुरू होणार आहे. या १९ जिल्ह्यात शिवसेनेचे १९ खासदार शिवसंपर्क अभियान सुरू करणार आहेत. पहिल्या टप्यातील १९ जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार आणि त्यांच्यासोबत शिवसेना पदाधिकार्यांची १२ जणांची टीम कार्यरत असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसंपर्क अभियानाच्या मार्फत शिवसेना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत राज्यात शिवसेना करत असलेल्या विकास कामांची माहिती पोहचवणार आहे.