scorecardresearch

“दीपक केसरकर अचानक कंठ फुटल्याप्रमाणे…” भास्कर जाधव यांचं बंडखोर आमदारांवर टीकास्र

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यासह बंडखोर आमदारांवर टीकास्र सोडलं आहे.

“दीपक केसरकर अचानक कंठ फुटल्याप्रमाणे…” भास्कर जाधव यांचं बंडखोर आमदारांवर टीकास्र
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर व शिवसेना आमदार भास्कर जाधव (संग्रहित फोटो)

मागील दोन दिवसांपासून विधानसभेच पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज विधानसभेतील कामकाज संपल्यानंतर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, बंडखोर आमदारांची वक्तव्ये यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसेच बंडखोर आमदारांवर खुल्या मैदानात बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, दीपक केसरकरांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांबाबत विचारलं असता भास्कर जाधव म्हणाले की, “दीपक केसरकर हे सध्या अचानक कंठ फुटल्याप्रमाणे बोलत आहेत. याकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. त्यामुळे ते काय बोलतात? याकडे फार लक्ष देण्याची आवश्यकता मला वाटत नाही” असा टोला भास्कर जाधवांनी लगावला आहे.

हेही वाचा- “तुम्ही तुमच्या घरी मंत्री असाल” नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना विधान परिषदेत खडसावलं, म्हणाल्या…

“येत्या काळात महाविकास आघाडीतील काही आमदार शिंदे गटात सामील होतील” या उदय सामंतांच्या विधानाबाबत विचारलं असता, भास्कर जाधव यांनी थेट उत्तर देणं टाळलं आहे. यावेळी ते म्हणाले की, “तुम्ही ज्या आमदारांची नावं घेत आहात, त्यांच्याबाबत मी अद्याप बोलायला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे आज मी यांच्याबाबत फार काही बोलू इच्छित नाही. पण खुल्या मैदानात जेव्हा मी बोलायला सुरुवात करेन, त्यावेळी तुम्ही पण माझं बोलणं काय आहे? ते ऐकाल. त्यामुळे आज यांच्या कोणत्याही वक्तव्याला फार महत्त्व द्यायची माझी इच्छा नाही.”

हेही वाचा- मविआतील आणखी काही आमदार शिंदे गटात सामील होणार? उदय सामंतांचं सूचक विधान!

पुढे उद्धव ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत माहिती देताना भास्कर जाधव यांनी सांगितलं की, शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर काही दिवसांतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण महाराष्ट्र दौरा करणार आहे, अशी घोषणा केली होती. पण दरम्यानच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी झालेली अतिवृष्टी आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे हा दौरा लांबणीवर पडला आहे. पण लवकरच उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. ज्याठिकाणी बंडखोरी झाली त्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यात उद्धव ठाकरे नक्की जाणार आहेत, असंही भास्कर जाधव यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या