शिवसेनेच्या आमदारांचे शिवसंपर्क अभियान

मराठवाडय़ात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे. अजूनही शेतकऱ्याच्या घरात २० ते २५ टक्के तूर शिल्लक आहे. तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करेपर्यंत केंद्र चालू राहतील, असे सरकारने आश्वासन दिलेले आहे. ते आश्वासन पाळले पाहिजे. सरकारच्या कामकाजाबाबत सामान्य जनतेच्या मनात उदासीनता असल्याची भावना आज शेतकऱ्यांशी संवाद साधताना अनुभवण्यास आली, असे कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील व परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पत्रकार बठकीत सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून शनिवारी जिल्ह्य़ात शिवसंपर्क अभियानांतर्गत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आमदार उल्हास पाटील व त्यांचे सहकारी अरुण दुधवडकर यांनी परभणी व गंगाखेड मतदारसंघात शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते. आज तालुक्यातील आसोला, िपगळी मुरुंबा गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच परभणीच्या एमआयडीसीतील तूर खरेदी केंद्राला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप केला. शेतकऱ्यांच्या शेतात व बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. कापसाला व तुरीला हमीभाव मिळत नसल्याची नाराजी शेतकऱ्यांच्या भेटीतून जाणवली. शेतकऱ्यांना पुरेसा पीककर्ज पुरवठाही होत नसल्याचे या अभियानांतर्गत समोर आले. दोन वर्षांपूर्वीचा पीक विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नाही. या सर्व बाबीचा अहवाल रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना औरंगाबाद येथे सादर केला जाईल, असे आमदार उल्हास पाटील यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य शासनाला व संबंधित खात्याला तुरीचे बंपर पीक येणार हे माहीत होते. परंतु तूर खरेदीबाबत कुठलेही नियोजन केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर दहा-पंधरा दिवस रांगा लावाव्या लागत आहे. यासाठी वाहनाचाही भरुदड सहन करावा लागत आहे. जागेवरच खरेदी करण्याचे नियोजन केले असते तर हा प्रश्न निर्माण झाला नसता, असे डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले. अभय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.