गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रचंड उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. शिवसेनेतल्याच ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं आणि शिंदे गट आणि भाजपा यांच्या युतीचं सरकार राज्यात स्थापन झालं. मात्र, आता या सरकारच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिका शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या असून त्यावर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारचं भवितव्य आणि राज्यातील राजकीय स्थैर्य या दोन्ही बाबतीत संभ्रमावस्था असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गेल्या १२ तासांत दोन ट्वीट करत शायरीच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे बंडखोरांवर टीकास्त्र सोडलं आहे.

“मनुष्य का हमेशा डर के माध्यम से..”

आज सकाळी संजय राऊतांनी केलेल्या ट्वीटमध्ये ओशो यांचं एक वाक्य शेअर करण्यात आलं आहे. बंडखोरी केलेल्या शिवसेना आमदारांना ईडी, सीबीआय अशा केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईची भिती घालण्यात आल्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा दावा शिवसेनेनं पहिल्यापासूनच केला आहे. या पार्श्वभूमीवर राऊतांच्या या ट्वीटचा अर्थ लावला जात आहे.

“मनुष्य का हमेशा डर के माध्यम से ही शोषण किया जाता है – ओशो! जो डर गया, वो मर गया. जय महाराष्ट्र”, असं राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री संजय राऊतांनी अशाच प्रकारे स्वत:चा फोटो ट्वीट करून त्यासोबत एक शेर लिहिला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटासोबत जाणारे आमदार, खसदारांची संख्या हळूहळू वाढताना दिसून आली. या पार्श्वभूमीवर राऊतांनी केलेल्या या ट्वीटचा संदर्भ लावला जात असून त्यांनी अप्रत्यक्षपणे या ट्वीटमधून बंडखोरांनाच लक्ष्य केल्याचं बोललं जात आहे. “जब वक्त बुरा चल रहा हो, तो लोग हाथ नहीं, गलतियां पकडते है!” असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

शिवसेनेतील फूटप्रकरणाचा पेच कायम ; घटनात्मक मुद्दय़ांमुळे १ ऑगस्टची सुनावणी व्यापक पीठासमोर?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार?

दरम्यान, एकीकडे राज्यातील संभ्रम दिवसेंदिवस वाढतच असताना दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी १ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्यामुळे नेमकं पुढे काय होणार? याविषयी तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जैसे थे आदेश हे फक्त आमदारांवर कारवाईसंदर्भात असून त्याचा मंत्रीमंडळ विस्ताराशी संबध नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं आहे.