सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील” हा डायलॉग सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या या डायलॉगमुळे त्यांची ओळख आता संपूर्ण महाराष्ट्राला झाली आहे. पण त्यांचा आमदार होण्याचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. आपल्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी एकूण ७ वेळा निवडणूक लढली. यामध्ये त्यांना पाचवेळा परभवाचा सामना करावा लागला. निवडणूक हरणं ही त्यांच्यासाठी नेहमीची बाब बनली होती.

पण सतत निवडणूक हरून घरी गेल्यानंतर त्यांच्या बायकोची प्रतिक्रिया काय असायची, याचा खुलासा त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केला आहे. निवडणूक हरल्यानंतर काय स्थिती असायची याबाबत विचारलं असता, शहाजीबापू पाटील म्हणाले की, “१९९० पासून सलग ७ निवडणुका लढलो, सर्व निवडणुका एकदम अटीतटीच्या व्हायच्या. गावागावांत रणधुमाळी असायची पण त्या काळात कुठेही गुन्हे घडायचे नाहीत.”

“सांगोला विधानसभेत सलग ११ निवडणूक जिंकलेले गणपतराव देशमुख यांच्यासोबत माझा सुसंवाद होता. निवडणूक हरल्यानंतर मी त्यांना भेटायचो. ते माझ्या पाठीवर हात ठेवायचे, थांबायचं नाही पुढे चालायचं, आठ दिवसांनी भेटू म्हणायचे. निवडणूक हरलो म्हणून पोरं रडायचे, कार्यकर्ते नाराज व्हायचे, याचं मला फार काही वाटत नसायचं. पण गाव जवळ आलं की भीती वाटायची, बायकोचा राडा, तिचं रडणं, तिचं ओरडणं याला सामोरं कसं जायचं? याची भीती मनात असायची. हा नेहमीचा ठरलेला कार्यक्रम असायचा. घरी गेलो की ह्याला उभं राहायला कुणी सांगितलं? सारखं उभं राहतंय, पडतंय, आमचा अपमान करतंय, अशी बायकोची प्रतिक्रिया असायची. एवढ्या वेळी जाऊ दे, पुढच्या वेळी निवडून येऊ, असं सांगून वेळ मारून न्यायचो,” असंही शहाजीबापू पाटील म्हणाले.

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंना घरातूनच दगा मिळाला”, नितेश राणेंनी ‘या’ नेत्यावर केले गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरंतर, सांगोला विधानसभा मतदार संघात डाव्या विचारसरणीचे नेते गणपतराव देशमुख यांनी सलग ११ वेळा निवडणूक जिंकली आहे. गणपतराव देशमुखांना सांगोला विधानसभा मतदार संघात हरवणं कठीण काम होतं. असं असूनही शहाजीबापू पाटील गणपतराव देशमुख यांच्याविरोधात १९९० पासून सलग ७ वेळा निवडणूक लढले आहेत. यामध्ये ५ वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.