संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळत आहे. पोटनिवडणुकीत पुरोगामी विचारातून सुरू झालेला प्रचाराचा मुद्दा हिंदूत्वाच्या वळणावर येऊन ठेपला होता. हिंदूत्ववादी विचारसरणीच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्याच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन्हीकडून जोरदार प्रयत्न केला आहे. मात्र या निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. यावरुन आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत.

“काही लोकांनी राजकीय हनुमान जयंती साजरी करण्याचा चंग बांधला असेल तर ती त्यांना लखलाभ ठरो. राम आणि हनुमान हे कायम आमचे श्रद्धास्थान आहेत. ही सर्व दैवते आमच्याच पाठीशी राहिलेली आहेत. ही सर्व दैवते आमच्याच पाठीशी राहिलेली आहेत. रामाचा धनुष्य आणि हनुमानाची गदासुद्धा आमच्या हातात आहे. कोल्हापूरमध्ये राम आणि हनुमानाचे किती राजकारण करण्यात आले. तरीही दोन्ही दैवते ही महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या पाठीशी आहेत,” असे संजय राऊत म्हणाले.

“कोल्हापूरची निवडणुक जिंकण्यासाठी त्याच काळामध्ये भोंग्याचे सगळे प्रकार सुरु करण्यात आले. पण त्यांचा भोंगा वाजला नाही आणि वाजणारही नाही. कारण जनता त्यांना ठेंगाच दाखवणार आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असताना यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणुकीत उतरलेले आणि आता भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना भाजपने उमेदवारी दिली होती. गेले काही दिवस मविआ आणि भाजपाच्या राज्यभरातील प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडत राहिल्या. त्यामुळे आता या निकालाकडे सर्वाचेंच लक्ष लागले आहे.