रामनवमीच्या दिवशी दहा राज्यांत दंगली झाल्या, हे चित्रं चांगले नाही. यापूर्वी रामनवमीच्या शोभायात्रेत फक्त धर्म आणि संस्कृतीचेच प्रदर्शन असे. आता अशा शोभायात्रेत तलवारी नाचवल्या जातात. धार्मिक द्वेष निर्माण केला जातो. सरसंघचालक मोहन भागवत यांनी १५ वर्षांत अखंड हिंदू राष्ट्र होईल, असे सांगितले आहे. त्याची ही सुरुवात आहे काय? अशी विचारणा शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्रात मशिदींवरील भोंग्यांचे, तर देशात इतरत्र रामनवमीच्या दंगलींचे राजकारण सुरू झाले आहे. धर्मांधतेची आग लावून, शांततेला चूड लावून कुणाला निवडणुका जिंकायच्याच असतील तर ते देशाच्या दुसऱ्या फाळणीचे सुरुंग स्वतःच्याच हाताने पेरताना दिसत आहेत. ‘देशाचे तुकडे तुकडे झाले तरी चालतील, पण धार्मिक विद्वेष निर्माण करून निवडणुका जिंकायच्या’ असे धोरण भाजपासारख्या पक्षाने उघडपणे स्वीकारले आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

“रामनवमी उत्सव देशात वर्षानुवर्षे साजरा होत आहे. रामजन्माचा उत्सव ही श्रद्धा आहेच, पण या वेळी प्रथमच रामनवमीनिमित्त देशात अनेक ठिकाणी हातात तलवारी व शस्त्रे घेऊन मोठमोठे जुलूस निघाले. या उत्सवी लोकांनी मशिदीसमोर थांबून गोंधळ घातला व त्यातून अनेक राज्यांत दंगलीच्या ठिणग्या पडल्या. मध्य प्रदेशातील खरगोन येथे रामनवमीनिमित्त जे घडले ते पाहून श्रीरामही अस्वस्थ झाले असावेत. अयोध्येतील राममंदिराच्या लढय़ातून ज्यांनी पळ काढला ते आता रामाच्या नावावर तलवारी काढत आहेत. याला हिंदुत्व म्हणता येणार नाही,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

“रामनवमीच्या दिवशी दहा राज्यांत दंगे झाले. या राज्यांत लवकरच विधानसभा निवडणुका होत आहेत. झारखंड, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांचा त्यात समावेश आहे. रामनवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आल्या व त्यावर दुसऱ्या गटांकडून दगडफेक करण्यात आली. मुंबईतील मानखुर्द भागातही या दिवशी तणावाची स्थिती निर्माण झाली. आश्चर्य असे की, रामनवमीच्या आधी मुंबईसह महाराष्ट्रात हिंदू नववर्ष गुढीपाडवा जोरात साजरा झाला. मुंबईत, पुण्यात, ठाण्यात, डोंबिवलीत, नाशकात, नागपुरात भव्य शोभायात्रा निघाल्या. अनेक शोभायात्रा मुसलमानांच्या वस्त्यांतून वाजतगाजत गेल्या, पण या शोभायात्रांवर कोणी दगड मारले नाहीत की हल्ले केले नाहीत. मग हे सर्व प्रकार फक्त रामनवमीच्याच दिवशी का व्हावेत?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.

“गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेने काढलेल्या रामनवमी यात्रेवर दुसऱ्या गटातील लोकांनी दगड फेकले. गुजरात राज्यात – जे मोदींचे व शहांचे राज्य आहे आणि आज जो हिंदुत्वाचा गड मानला जातो, त्या राज्यात मुसलमान रामनवमी यात्रेवर दगड मारतील हे कुणाला पटेल काय?,” असं आश्चर्यही संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे.

“भाजपा किंवा त्यांच्या ‘बी’ टीमने अशा यात्रा काढल्या तर हमखास गडबड”

“पश्चिम बंगालात हावडा-शिवपूर भागातही धार्मिक तणाव निर्माण झाला. विश्व हिंदू परिषदेने रामनवमीची यात्रा काढली. त्यात भडकाऊ भाषणे केली. त्यातून आग पेटली. रामनवमीत भडकाऊ भाषणांची प्रथापरंपरा कधी सुरू झाली? अशोक सिंघल विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख होते तोपर्यंत या प्रथापरंपरा नव्हत्या, मग हे सर्व आता कोण घडवत आहे? मुंबईत शिवसेनेने हिंदुत्वाच्या शोभायात्रा काढल्या तर त्यावर हे असे हल्ले वगैरे होणार नाहीत, पण भाजपा किंवा त्यांच्या ‘बी’ टीमने अशा यात्रा काढल्या तर हमखास गडबड होईल याची व्यवस्था करून ठेवलेली दिसते. रामनवमीच्या दिवशी झालेली हिंसा तेच सांगते,” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

“जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रामनवमीच्या दिवशी ‘शाकाहार-मांसाहार’ या वादावरून दंगल पेटवण्यात आली. त्यात दहा विद्यार्थ्यांची डोकी फुटली. ते सर्व विद्यार्थी हिंदूच होते. रामजन्मदिनी ‘मांसाहार’ करायचा नाही इथून वाद सुरू झाला तो ‘रामनवमी’ उत्सवास विरोध केला म्हणून ‘राडा’ झाला या मुद्दय़ापर्यंत येऊन थांबला. देशभरात हिंदू-मुसलमानांत आग लावायची, दंगे भडकवायचे, त्याच आगीवर निवडणुकांच्या भाकऱ्या शेकवायच्या हा राजकीय खेळ देशाला जाळून टाकणार आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“भाजपाला हवा तोच अजेंडा राज ठाकरे राबवीत आहेत”

“मनसेप्रमुख राज ठाकरे हे सुरुवातीला ‘मराठी माणूस व अस्मितेचा प्रश्न’ घेऊन उभे राहिले. शिवसेनेसमोर हा विषय टिकला नाही तेव्हा आता ते हिंदुत्वाच्या दिशेने वळले व मशिदींवरील भोंगे बंद झाले नाहीत तर मशिदींसमोर भोंगे लावून ‘हनुमान चालिसा’ वाचू असा इशारा देऊन मोकळे झाले. भारतीय जनता पक्षाला हवा तोच अजेंडा श्री. राज ठाकरे राबवीत आहेत. मुंबई-ठाण्यात महापालिका निवडणुकांची ही तयारी व हनुमंताच्या नावावर दंगली घडल्या तर महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर राष्ट्रपती शासन, असा हा ‘गुणरत्नी’ खेळ सुरू आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“धर्मांध मुसलमान आतंकवाद्यांसारखे वागत होते तसे हिंदूंना वागून चालेल काय?”

“देशात 22 कोटी मुसलमान आज आहेत व ते देशाचे नागरिक आहेत. मुसलमानांची संख्या वाढते आहे. हा कुणासाठी चिंतेचा विषय असेल तर सक्तीचे कुटुंब नियोजन, समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रणासारख्या कायद्यांची अंमलबजावणी हे त्यावरचे उपाय आहेत. रामनवमीच्या दंगली व मांसाहारावरून रक्तपात हा त्यावरचा उपाय नाही. कालपर्यंत मुसलमानांच्या बाबतीत जगभरात ‘आतंकी’ हा शब्द रुढ झाला. हिंदूंच्या बाबतीत जगात असा अपप्रचार होऊ नये. त्यात हिंदू धर्माची बदनामी आहे. उत्तर प्रदेशातील एक भगवा वस्त्रधारी साधू मुसलमान महिलांवर बलात्कार करण्याची भाषा वापरतो. त्या वक्तव्यावर काहीच कारवाई होत नाही, पण वॉशिंग्टनला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हिंदुस्थानातील मानवी हक्कांच्या उल्लंघनावर प्रश्न उपस्थित होताच दुसऱ्याच दिवशी बजरंग मुनीवर गुन्हा दाखल होऊन त्यास अटक केली जाते. याचा अर्थ अशा की, हिंदुस्थानातील अशा घटनांवर जागतिक स्तरावर लक्ष आहे. कालपर्यंत धर्मांध मुसलमान आतंकवाद्यांसारखे वागत होते तसे हिंदूंना वागून चालेल काय? हाच खरा प्रश्न आहे,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

“राजस्थानच्या करौलीत रामनवमीच्या शोभायात्रेनिमित्त हिंसा झाली. ओवेसी महाशय जयपूरला पोहोचले व त्यांनी काँग्रेसला प्रश्न विचारला, “रामनवमीच्या यात्रेची परवानगी काँग्रेस सरकारने दिलीच कशी?’’ हिंदुस्थानात रामनवमीच्या यात्रांवर बंदी घालता येणार नाही. काँग्रेस राज्यात अशा यात्रांवर निर्बंध घातले तर भाजप व त्यांच्या इतर संघटनांना तेच हवे असते. राजस्थानात विधानसभा निवडणुका आहेत. हे पाहिले तर रामनवमीच्या दंग्याचे सूत्र समजू शकेल. रामाचं नाव घेऊन द्वेषाचं विष पसरवणे हा राम या संकल्पनेचाच अपमान आहे. असे करणे हे निर्लज्जपणाचे लक्षण असल्याचे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे म्हणतात ते सत्य आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

“हरिद्वारच्या एका हिंदू मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी येत्या पंधरा वर्षांत अखंड हिंदू राष्ट्र निर्माण होईल असे सांगितले. हातात काठी घेऊन अहिंसेच्या मार्गाने अखंड हिंदू राष्ट्र तयार करू ही कल्पना चांगलीच आहे, पण रामाच्या नावाने अशा हिंसेचे तांडव करून देश अस्थिरता व तणावाच्या खाईत ढकलला जात आहे. त्यातून नव्या फाळणीची बिजे रोवली जातील व अखंड हिंदुस्थान करताना धार्मिक विद्वेषातून निर्माण झालेले आपल्याच देशाचे तुकडे तुकडे वेचावे लागतील. एका फाळणीसाठी माथेफिरू गोडसे निर्माण झाला. गांधींना त्याने मारले. मरताना गांधी ‘हे राम’ म्हणाले! आज तोच राम अहंकार, धर्मांधतेच्या अग्नीत देश जळताना पाहत आहे! रामाच्या नावाने तुकडे तुकडे गँग निर्माण होणार असेल तर अखंड हिंदू राष्ट्र कसे निर्माण होणार? रामाच्या नावाने निवडणूक जिंकाल, पण देश राहील काय?,” अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena sanjay raut saamana rokhthok rss mohan bhagwat akhand bharat riots on ram navmi sgy
First published on: 17-04-2022 at 09:26 IST