राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स देखील बजावले आहेत. या चौकशीसाठी अद्याप अनिल देशमुख उपस्थित राहिले नसले, तरी त्यावरून आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे. भाजपाकडून या मुद्द्यावरून सत्ताधारी महाविकासआघाडीला लक्ष्य केलं जात असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून भाजपाला खोचक सवाल केला आहे. “अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घ्यायला हवी. भाजपाच्या लोकांवर कधी असे आरोप झाले नाहीत का? सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का? ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? बाकी सगळे हरामखोर आहेत का?” अशी प्रश्नांची सरबत्ती संजय राऊत यांनी भाजपावर केली.

एकीकडे अनिल देशमुख यांना ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्वव ठाकरेंना पत्र लिहून भाजपाशी पुन्हा युती करण्याची गळ घातली आहे. या दोन मुद्द्यांवरून भाजपाकडून सातत्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकासआघाडी सरकारला लक्ष्य केलं जात आहे. त्यावर संजय राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना निशाणा साधला.

जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का?; अतुल भातखळकर यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

“तिन्ही नेते लवकरच पुढील पावलं टाकतील”

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते एकत्र बसून पुढील पावलं टाकतील, अशी माहिती दिली. “अनिल देशमुख यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोललो. अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घेतली पाहिजे. त्यातले बरेच विषय मी सुद्ध समजून घेतले आहेत. प्रताप सरनाईक यांचीही बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांच्यावर आरोप लावून ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारचे आरोप भापपाच्या लोकांवर कधी झाले नाहीत का? तिथे सगळे धुतल्या तांदळाप्रमाणे आहेत का? ते सगळे हरिशचंद्राचे अवतार आहेत का? बाकी सगळे हरामखोर आहेत का? याचा राज्यातल्या ११ कोटी जनतेनं विचार करण्याची वेळ आली आहे. लवकरच त्यासंदर्भात मुख्यमंत्री, शरद पवार, काँग्रेसचे नेते एकत्र बसून पुढील पावलं टाकतील असं दिसतंय”, असं संजय राऊत म्हणाले.

“हे तर भाजपाचं वैफल्य”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर संजय राऊतांचा टोला!

दोनच दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी सामनामधल्या रोखठोक या सदरातून प्रताप सरनाईक यांच्या पत्रातील मुद्द्यांवर देखील परखड भाष्य केलं आहे. “एका बाजूला प्रताप सरनाईक, दुसऱ्या बाजूला अनिल देशमुख हे दोघेही विधानसभेचे सदस्य. देशमुख हे कालपर्यंत राज्याचे गृहमंत्री होते. महाराष्ट्र सरकारच्या नाकावर टिच्चून ‘ईडी’ केंद्रीय पोलिसांच्या मदतीने हे सर्व करीत आहे. प्रताप सरनाईक हे गेल्या पाच महिन्यांपासून परागंदा आहेत. ‘ईडी’चे तपास अधिकारी त्यांच्या मागे हात धुऊन लागले. सरनाईक व त्यांच्या कुटुंबीयांना या सर्व प्रकरणात मनस्ताप सुरू आहे. सरनाईक यांनी एक पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिले व राजकारणात खळबळ उडवली”, असं संजय राऊतांनी या लेखात नमूद केलं आहे.