महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सध्या नाना पटोले विरुद्ध बाळासाहेब थोरात असा थेट वाद पाहायला मिळत आहे. बाळासाहेब थोरातांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे हा वाद विकोपाला गेल्याचं सिद्ध झालं आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे थोरातांनी राजीनामा पाठवताना ‘नाना पटोलेंसोबत काम करणं कठीण झालंय’, असं नमूद केल्यामुळे आता हायकमांडनंच मध्यस्थी करण्याची अपेक्षा राज्यातील अनेक काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून ठाकरे गटानंही त्यांना लक्ष्य केलं आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार पडण्यामागे मुख्य कारण नाना पटोलेंची ‘ती’ कृती ठरल्याचा दावा सामनातील अग्रलेखातून करण्यात आला आहे.

‘पटोले-थोरात शहाणे नेते आहेत, फार काय बोलावं’

नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद सामोपचाराने मिटवण्याचा सल्ला अग्रलेखातून देण्यात आला आहे. ‘संसदेत राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावर जोरदार भाषण करून पंतप्रधान मोदींसमोर आव्हान उभे केले आहे. अशा वेळी त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मतभेद गाडून एकदिलाने काम करणे गरजेचे आहे. पटोले-थोरात वाद चिघळू नये. टपून बसलेल्या भाजपच्या बोक्यांच्या तोंडी आयताच लोण्याचा गोळा पडू नये ही अपेक्षा. पटोले व थोरात हे शहाणे नेते आहेत. फार काय बोलावे?’ असं अग्रलेखात म्हटलं आहे.

‘थोरातांनी सध्याचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. थोरातांच्या बंडामुळे काँग्रेस पक्षाच्या उरलेल्या फांद्या हलू लागल्या आहेत. पटोले विरुद्ध थोरात हा वाद बरेच दिवस खदखदत होता. त्यास आता उघड तोंड फुटले’, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

“थोरातांच्या आरोपांत तथ्य असू शकते”, ठाकरे गटाच्या काँग्रेसला कानपिचक्या; सत्यजीत तांबेंचाही केला उल्लेख!

नाना पटोलेंना केलं लक्ष्य

दरम्यान, अग्रलेखात थोरात-पटोले वादावर भाष्य करताना नाना पटोलेंना लक्ष्य करण्यात आलं आहे. ‘थोरात हे पटोले यांच्या आधी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते व महाविकास आघाडीचे सरकार असताना थोरातांची भूमिका समन्वयाचीच होती हे मान्य करावेच लागेल. महाविकास आघाडीचे सरकार पडले किंवा पाडले गेले त्यामागे अनेक कारणे असली तरी मुख्य कारण म्हणजे, विधानसभा अध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांनी दिलेला तडकाफडकी राजीनामा. पटोले यांचा राजीनामा हा शहाणपणाचा निर्णय नव्हता व तेथूनच संकटाची मालिका सुरू झाली. ती नंतर थांबली नाही’, अशा शब्दांत नाना पटोलेंवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘चांगलं चाललेलं सरकार पटोलेंमुळे अडचणीत आलं’

‘विधानसभा अध्यक्षपद हे आघाडी सरकारात महत्त्वाचे ठरते. अध्यक्षपदी पटोले असते तर पुढचे अनेक पेच टाळता आले असते व पक्षांतर करणाऱ्यांना जागेवरच अपात्र ठरवणे सोपे झाले असते. पटोले यांच्या राजीनाम्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक राज्यपालांनी होऊच दिली नाही व त्याचाच फायदा पुढे ‘खोके’बाज आमदार व त्यांच्या दिल्लीतील ‘महाशक्ती’स मिळाला. तेव्हा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय हा घिसाडघाईचा व अपरिपक्व होता. पुढे हेच पटोले काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. पण महाराष्ट्राचे चांगले चाललेले सरकार त्यांच्या एका निर्णयामुळे कायमचे संकटात आले हे सत्य मान्य करावेच लागेल’, असंही अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.